मालेगाव : नाशिकच्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २४) मालेगाव बाजार समिती व झोडगे उपबाजार आवार व मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावरील व्यवहार बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती कृउबा उपसभापती सुनील देवरे यांनी दिली आहे. नाशिक येथे शनिवारी मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मालेगाव तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी नाशिक येथे जाणार असल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीमधील व्यवहार बंद ठेवण्याबाबत सुचित केले होते. बहुसंख्य शेतकरी बांधव तसेच बाजार समितीचे इतर घटक नाशिक येथील मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याने मालेगाव मुख्य बाजार आवारासह झोडगे उपबाजार आवारातील तसेच मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावरील सर्व नियंत्रत शेतीमालाचे दैनंदिन कामकाज (लिलाव, मोजमाप वगैरे) बंद ठेवण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी शेतमाल बाजार समितीच्या बाजार आवारांवर विक्रीसाठी आणू नये तसेच या मोर्चात व्यापारी व युनियनचे सभासद सहभागी होणार असल्याने लिलाव बंद ठेवण्यात येणार असल्याचे उपसभापती देवरे, सचिव अशोक देसले, आडते असोसिएशनचे अध्यक्ष भिका कोतकर, माथाडी युनियनचे अध्यक्ष सुदाम सूर्यवंशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आठवडे बाजार शुक्रवारी
उमराणे : नाशिक येथे येत्या शनिवारी (दि.२४) निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उमराणे येथील भरणारा आठवडे बाजार शनिवारऐवजी एक दिवसासाठी शुक्रवारी भरवण्याचा निर्णय येथील मराठा समाजाने घेतला आहे.विक्रेते, ग्राहक व शेतकरी बांधवांनी याची दखल घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमराणे येथे दर शनिवारी आठवडे बाजार भरतो. या यात उमराणेसह परिसरातील सांगवी, कुंभार्डे, चिंचवे, तिसगाव, खारी, वऱ्हाळे आदि गावातील शेतकरी शेतमाल विक्रीस आणतात.