आझादनगर : देशात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महापौर रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली दुपारी ३ वाजता अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यापैकी मोर्चेकऱ्यांच्या वतीने प्रांताधिकारी अजय मोरे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी आमदार आसीफ शेख, माजी महापौर सभागृहनेता ताहेरा शेख आदी उपस्थित होते. पेट्रोल-डिझलच्या किमतीमध्ये दैनंदिन होणारी भाववाढ, घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीमुळे गृहिणींचे नियोजन कोलमडले असून, याचा परिणाम होऊन सर्वसामान्य जनता महागाईने होरपळून निघत आहे. राष्टÑीय काँग्रेसच्या आदेशान्वये आज काँग्रेस कमिटी कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या अग्रभागी महापौर रशीद शेख बैलगाडीवर विराजमान झाल्याने आकर्षण ठरले. घोडे, तांगा, ठेलागाडीवर दुचाकी बांधून कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी विविध प्रकारच्या घोषणा देऊन मोदी सरकारवर टीका करण्यात आली.मोर्चा आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळा, मोसमपूलमार्गे अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोलिसांनी अडविला. यावेळी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. पक्ष प्रवक्ता साबीर गोहर, हाफीज अनिस अजहर, आमदार आसीफ शेख, महापौर रशीद शेख यांची भाषणे झाली.यावेळी नगरसेवक हाजी निहाल अन्सारी, ईस्माईल कुरैशी, जमील क्रांती, माजी नगरसेवक रफीक शेख खजूरवाला, अॅड. हिदायतउल्ला, तुराबअली साहेबअली, धर्मा भामरे, नगरसेवक नंदकुमार सावंत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी माजी महापौर ताहेरा शेख, नगरसेविका जैबुन्नीसा रिजवान व महिलांनी रस्त्यावरच चुलींवर भाकरी भाजून मोदी सरकारचा निषेध केला.
मालेगावी शहर काँग्रेसचा इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 1:44 AM