मालेगाव : तालुक्यातील दाभाडी शिवारात हॉटेल प्रीतम पॅलेससमोर विक्रीसाठी आणलेले तीन गावठी कट्टे व २७ जिवंत काडतुसे विनापरवाना बेकायदेशीररीत्या जवळ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी सालिक अहमद अब्दुल अजीज (२५) रा. तीन कंदील, छोटा मटन मार्केटसमोर, नयापुरा यास विशेष पोलीस पथकाने छापा टाकून अटक केली.त्याच्याविरुद्ध छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्या ताब्यातून तीन कट्टे, काडतुसे, दोन भ्रमणध्वनी संच असा एकूण ८५ हजार ४२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शनिवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना मिळालेल्या माहितीवरून उपनिरीक्षक नितीन पवार, प्रशांत पवार, सुनील पाटील, देवा पाटील आदिंनी सापळा रचून ही कार्यवाही केली.सालिक याच्यावर यापूर्वीदेखील प्राणघातक शस्त्र बाळगणे, खून, खुनाचा प्रयत्न असे तीन गुन्हे दाखल आहेत. त्याच्या ताब्यातून विशेष पोलीस पथकाने प्रत्येकी २५ हजार रुपये किमतीचे सफेद धातूचे मॅग्झीनसह तीन गावठी कट्टे (पिस्टल) एकूण किंमत ७५ हजार रुपये तसेच पाच हजार ४०० रुपये किमतीचे २७ जिवंत काडतुसे, चार हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा सिमकार्डसह भ्रमणध्वनी संच, एक हजार रुपये किमतीचा चायना कंपनीचा भ्रमणध्वनी संच, लाल रंगाची रॅग्झीन पिशवी असा ८५ हजार ४२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. छावणी पोलिसात पोलीस नाईक सुनील पाटील यांनी फिर्याद दिली. सालिक अहमद अ. अजीज याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वकर्मा करीत आहेत. (प्रतिनिधी)
मालेगावी गावठी कट्टे,२७ काडतुसांसह एक ताब्यात
By admin | Published: August 27, 2016 10:02 PM