मालेगाव (शफीक शेख) : सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने नागरिकांसह आरोग्य यंत्रणा धास्तावली असताना आता लहान मुलेही कोरोनाला बळी पडू लागली असून, पालकवर्गात दहशत पसरली आहे. सज्ञान आणि मोठया मुलांना घराबाहेर फिरू नका म्हणून समजावता येते. मात्र, वीस वर्षांखालील मुले अधिक बाधित होऊ लागल्याने पालकांत चिंता व्यक्त होत आहे. मालेगाव तालुक्यात गेल्या तीन महिन्यात सुमारे अठरा वर्षे वयोगटातील मुलेदेखील पॉझिटिव्ह मिळून आली आहेत.
मालेगाव शहराबरोबरच ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्याच बरोबर लहान मुलांनादेखील ही बाधा झाल्याने डोकेदुखी वाढू लागली आहे. तालुक्यात आतापर्यंत गेल्या तीन महिन्यात १ ते १८ वयोगटातील सुमारे १४१ मुले आणि मुली बाधित झाली. तालुक्यात आतापर्यंत ८७ मुले आणि ५४ मुलींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील ७७ मुलगे आणि मुली यांना कोरोना मुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात ५१ मुलगे आणि २६ मुलींचा समावेश आहे. सध्या ६४ बाधित मुलगे आणि मुली उपचार घेत आहेत. त्यात ३६ मुलगे आणि २८ मुली असून, त्यांच्यावर कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत, तर काही मुलगे व मुलींना घरीच गृहविलगीकरण करण्यात आले आहे.
---------------------------
कमी लक्षणे असणारी आणि ज्यांना फारसा त्रास नाही. परंतु घरातील नातलगांमुळे संसर्ग झाल्याने ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशा मुलांना घरी विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे.
- डॉ. शैलेश निकम, तालुका वैद्यकीय अधिकारी
---------------------------------- ---
मालेगाव शहरात ३४३ मुले मुली बाधित
१) मालेगाव तालुक्यापेक्षा शहरात १ ते २० वयोगटातील कोरोनाने बाधित मुले आणि मुली यांची संख्या अधिक आहे. शहरात जानेवारी ते मार्च अशा तीन महिन्यात २ हजार ९५४ बाधित मिळून आले. जानेवारी महिन्यात १५१२ जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले होते. त्यात ११३ जण बाधित मिळून आले. एक हजार ३९९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. यात २० वर्षांआतील १७ मुलगे व मुलींचा समावेश होता. त्यातील ८ मुलगे आणि ९ मुली बाधित मिळून आल्या होत्या. सरासरी ११.५० टक्के बाधितांचे प्रमाण होते.
२) फेब्रुवारी महिन्यातदेखील १ ते २० वयोगटातील १७ मुले मुली बाधित आढळून आली. यात १० मुलगे आणि ७ मुलींचा समावेश होता. मुलींच्या तुलनेत ३ मुलगे अधिक बाधित होते. फेब्रुवारीत १५७९ जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासले. त्यात १३१ जण बाधित मिळून आले होते, तर १४४८ निगेटिव्ह होते. १२.९७ टक्के प्रमाण होते.
३) मार्च महिन्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच गेली. मार्चमध्ये २० वर्षांखालील ३०९ मुलगे आणि मुलींना कोरोनाची बाधा झाली. यात १८७ मुलगे आणि १२२ मुली कोरोनाने बाधित झाल्या. म्हणजे ६५ मुलगे अधिक बाधित झाले. मार्च महिन्यात ६ हजार २२० जणांचे घशातील स्त्रावाचे नमुने घेतले. त्यात २ हजार ७१० बाधित मिळाले, तर ३ हजार ५१० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, अशी माहिती मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी दिली.