वडनेर : मालेगाव ते अजंग राज्यमार्गाचे रखडलेले काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी येथे प्रशांतनगर बायपासजवळ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, राजगड प्रतिष्ठान, मातोश्री रिक्षाचालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह व ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.अजंग ते मालेगाव या रस्त्याच्या रूंदीकरणाच्या नावाखाली ९ ते १० महिन्यांपासून रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून ठेवला आहे. अरूंद रस्त्यावर वाहतूक सुरू असल्याने वापरण्यात येणारा रस्ताही अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हाच प्रश्न निर्माण झाला असून या रस्त्याच्या कामाबाबत यापूर्वीही अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना रस्ता दुरुस्तीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले होते; मात्र निवेदन देऊन पंधरा ते वीस दिवस उलटल्यानंतरही सदर रस्त्याच्या कामाबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने शनिवारपासून (दि.१४) आमरण उपोषण करण्याचा निर्णय अजंग व वडेल ग्रामस्थांनी घेतला आहे.या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे यापूर्वीही अनेकदा अपघात झाले असून, रस्ते अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अपघातात वाहनचालक जखमी होत आहेत; मात्र तरीही संबंधित खात्याने अजंग- मालेगाव रस्ता रुंदीकरणाच्या कामात दिरंगाई करीत वेळकाढूपणा केला आहे. या वेळकाढूपणाच्या निषेधार्थ व रस्ता दुरुस्तीच्या कामास गती मिळावी या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आले आहे. अजंग ते मालेगाव रस्ता हा मृत्यूचा सापळा झाला असून, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी झोपेचे सोंग घेतले आहे. वेळोवेळी पाठपुरावा करूनही दखल न घेतल्यामुळे आज बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे भाजप युवामोर्चाचे सुनील शेलार यांनी सांगितले.आजपर्यंत मालेगाव-नामपूर रस्त्यावर विविध अपघातात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अजून किती लोकांचा जीव घेण्याची वाट प्रशासन बघणार आहे असा सवाल राजगड प्रतिष्ठानचे राहुल पवार यांनी उपस्थित केला आहे.भारतीय जनता युवा मोर्चाचे सुनील शेलार व राजगड प्रतिष्ठानचे राहुल पवार यांच्यासह शेखर पगार, रवि कन्नोर, भूषण बागुल, विकी पाटील, योगेश सोनवणे,प्रल्हाद सोनवणे, वसंत अहिरे, जगन्नाथ भदाणे, महेश तावडे, इम्तियाज शेख, विजय देवरे, हिरा बोरसे, योगेश पवार, सावकार शेलार, योगेश अहिरे आदींसह उपोषणकर्ते उपस्थित होते.वाहने खराब झाल्याने प्रवाशांचे हालमालेगाव ते अजंग दरम्यान मोठ्या प्रमाणात खासगी प्रवासी वाहतूक केली जाते. दररोज रिक्षा व जीप या रस्त्यावरून धावत असतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांमध्ये बिघाड होत आहे. वाहनांचे स्पेअरपार्ट्स तुटून पडत आहेत. रस्त्याच्या मध्यभागी खड्डे असल्याने वाहने कुठून चालवावीत, असा प्रश्न वाहनधारकांना पडत आहे. मोठे वाहन गेले तर रस्त्यावर धुराळा उडत असतो. पाठीमागून चालणाºया दुचाकीस्वारालाही धुळीचा सामना करावा लागतो. प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. संबंधित ठेकेदार रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी वेळकाढूपणा करीत आहे.