मालेगाव : राज्य शासनाने कोरोना रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातली असताना मालेगावी माजी आमदार आसिफ शेख यांनी शहरातील रौनकाबाद भागात विनापरवानगी जाहीर सभा घेऊन हजारोची गर्दी जमवून कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन केले. या प्रकाराची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून माजी आमदार शेख यांच्यासह पाच जणांविरुद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात दोघा आजी माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
कॉंग्रेस पक्षाला रामराम केल्यानंतर पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी माजी आमदार शेख गेल्या महिन्याभरापासून शहरातील विविध भागात चौक सभा घेत आहेत. शुक्रवारी रात्री रौनकाबाद भागात एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला पोलीस प्रशासनाने स्पष्टपणे परवानगी नाकारली होती. कोरोनाचा संसर्ग वाढू नये तसेच राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातली असताना सभा घेता येणार नाही अशी नोटीस माजी आमदार शेख यांना बजावली होती. तरीदेखील पोलीस प्रशासनाला व यंत्रणेला आव्हान देत माजी आमदार शेख यांनी जाहीर सभा घेत कोरोनाचे नियम पायदळी तुडवले. हजारोंची गर्दी जमवली. पक्ष प्रवेशाची भूमिका स्पष्ट करताना शहर हिताच्या १५ अटी व शर्ती मान्य झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी सभास्थळी जाऊन सभा घेऊ नका , गर्दी करू नका असे आवाहन केले, मात्र तरी देखील मोठ्या संख्येने गर्दी झाली होती .याप्रकरणी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, पोलीस उपधीक्षक लता दोंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. जमावबंदी आदेश असताना व कोरोनाचे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात माजी आमदार शेख यांच्यासह नगरसेवक फरीद मेंबर, माजी नगरसेवक रफिक भुऱ्या, रियाज अली, मेहमूद शहा, एकबाल बॉस या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पवारवाडी पोलीस करीत आहेत.