मालेगाव : धार्मिक, राजकीय, सामाजिक आणि गुन्हेगारीदृष्ट्या नेहमीच संवेदनशील मानल्या जाणाऱ्या मालेगाव शहरात गेल्या वर्षभरात बेकायदेशीर पिस्तुलांसह तलवारी सापडण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे मालेगावमध्ये पोलीस राज अस्तित्वात आहे की नाही, अशा प्रश्न निर्माण होतो. शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून, गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. शहरात खून, गावठी कट्ट्यांची सर्रास विक्री, घरफोड्या, मटका, जुगार, अवैध शस्त्रे व सराईत गुन्हेगारांनी मांडलेल्या उच्छादामुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत आहेत. पोलिसांनी राजकीय दबावाला झुगारून शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवून शहरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरात २२ पिस्तूल व ५७ जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केल्यानंतरही परराज्यातून पिस्तूल आणून सर्रास २० ते २५ हजार रुपयांना शहरात विकले जात आहे.
वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पोलीस ॲक्शन मोडमध्ये दिसत असले तरी याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांचा वचक कमी झाला आहे. महिनाभरापूर्वी सलग दोन दिवस खुनाचे प्रकार घडले होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे. या राजकारणामुळे गुन्हेगारांना बळ मिळत आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. गेल्या आठवड्यात पोलिसांनी ३ पिस्तुले व ७ जिवंत काडतुसे जप्त केली होती. याप्रकरणी अटक करण्यात आलेला हिबजुर रहेमान हा सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी त्याच्याकडून आझादनगर पोलिसांनी एक पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली होती. त्याच्या विरोधात ५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पिस्तूल विक्रीचे रॅकेट उघडकीस आणण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. गावठी पिस्तूल परराज्यातून आणले जातात. साधारण ५ हजारांत पिस्तूल तर २०० रुपयांत जिवंत काडतूस मिळते. शहरात पिस्तूल २० ते २५ हजाराला विकले जाते. तसेच तलवारींचीही सर्रास विक्री होत असते. अवैधरीत्या मोठ्या प्रमाणात जनावरांची वाहतूक केली जाते. पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांना तंबी दिली आहे; मात्र असे असले तरी वाढती गुन्हेगारी पोलीस प्रशासनापुढे डोकेदुखी ठरली आहे.
इन्फो
दोन गुन्हेगार हद्दपार
शहरात दुचाकी चोरीचे प्रमाणही वाढले असून, रोजच होणाऱ्या दुचाकी चोरीमुळे दुचाकीधारकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात शहरातील दोन गुन्हेगारांना हद्दपार केल्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहे. शाकीर खान सलीम खान या गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार जिल्ह्यांमधून हद्दपार करण्यात आले आहे. तर मोहंमद अमीन आरिफ अंजूम ऊर्फ आरिफ पुडी यास नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. शाकीर खान याच्यावर आयेशानगर पोलिसांत चार गुन्हे दाखल आहेत, तर मोहंमद अमीन आरिफ अंजूम ऊर्फ आरिफ पुडी याच्यावर ५ गुन्हे दाखल आहेत.