मालेगाव : शहरातील रॉयल व स्टार हॉटेल परिसरातून २ हजार ७०० लिटर बायोडिझेलसदृश द्रव्य जप्त करण्यात आले. तालुका पोलीस व महसूल विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली.
केंद्र सरकारने बी १०० बायो डिझेल वापरण्यास परवानगी दिली आहे. यात इतर इंधन टाकून त्याचा वाहनांमध्ये इंधन म्हणून वापर केला जातो; मात्र यात चुकीने तेल तसेच इंधनमिश्रीत द्रव्याची भेसळ होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. शहर परिसरात बायोडिझेल विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने तहसीलदार चंद्रजीत राजपूत व तालुका पाेलीस ठाण्याचे निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. रॉयल हॉटेल भागातून अकराशे लिटर तर स्टार हॉटेलजवळून सोळाशे लिटर बायोडिझेलसदृश द्रव्य ताब्यात घेण्यात आले. डिझेलपेक्षा साधारण २५ रुपये कमी दराने बायोडिझेल विकले जाते. जप्त द्रव्य पुरवठा निरीक्षक अशोक साबणे यांच्या उपस्थितीत सील करण्यात आले. द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत असून त्याचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ढुमणे यांनी दिली.