सचिन देशमुख
सोयगाव : मालेगाव बस स्टॅण्ड ते दरेगाव (जुना आग्रा रोड) हा रस्ता मोजून ३.९ किमीचा. ‘रस्ता कमी आणि खड्डे जास्त’ अशी परिस्थिती. या चार किलोमीटर रस्त्यावर लहान-मोठे धरून एकूण ४५७ खड्डे आहेत. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनचालक रोजच्या या दिव्यातून कसा प्रवास करतात याची प्रचिती या रस्त्याने प्रवास केल्यानेच येईल.
मालेगाव शहरातील अतिशय जुना आणि प्रचंड रहदारीचा हा मार्ग असून, जुना आग्रा रोड या नावाने प्रसिद्ध आहे. तालुक्यातील जवळपास ४० ते ४५ गावांचा संपर्क रस्ता असून, जळगाव, धुळे, नंदुरबार, शहादा, चोपडा, इंदूर, चाळीसगाव, पाचोरा येथून येणाऱ्या बसेसचा हा रोजचा मार्ग आहे. तसेच मालेगाव शहर हे यंत्रमागाचे शहर असल्याकारणाने मालवाहतूक करणारे ट्रक, टेम्पो यांचाही वापर मोठा आहे. तासाला या रस्त्याने जवळपास पाचशे ते सहाशे वाहने जातात. मात्र या रस्त्याने जाताना दुचाकीचालकांना मार्ग काढताना जिकिरीचे झाले आहे. गेल्या पाच दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने मालेगाव-दरेगाव रस्त्यावर खड्डे व त्यात पाणी साचल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे. या मार्गावर अवजड वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खड्डे पडण्यास व असलेल्या खड्ड्यांचा आकार वाढण्यास मदत झाली आहे. छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता वाढली असून, खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी वाहनधारक करत आहेत.
इन्फो
निकृष्ट दर्जाची कामे
परिसरातील बहुतांश रस्त्यांची गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरशः वाट लागली आहे. जागोजागी लहानमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्यानेच हे सर्व रस्ते खराब होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यालगत दुकाने, हॉटेल, रुग्णालय आहेत. सध्या या रस्त्यावरून पायी चालणेदेखील कठीण झाले आहे.
इन्फो लालपरीचेही नुकसान
प्रवाशांसाठी अहोरात्र धावणाऱ्या लालपरीचा प्रवास सुरक्षित समजला जातो. मात्र, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे लालपरीची स्प्रिंग तुटणे, टायर फुटणे, पंक्चर होणे, आसनव्यवस्था खराब होणे, पाटे तुटणे, निकामी होणे आदी प्रकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एसटीला मोठे अर्थिक नुकसान सोसावे लागते. शिवाय दिवसेंदिवस खराब रस्त्यांवरील खड्ड्यांच्या संख्येत वाढ होतच असल्याने दिवसभरात चार ते पाच बसेसची दुरुस्ती करावी लागत आहे.
फोटो- २५ मालेगाव रोड १
250821\185225nsk_23_25082021_13.jpg
फोटो- २५ मालेगाव रोड १