मालेगाव : राज्य शासनाने मालेगाव शहर हगणदारीमुक्त झाल्याचे जाहीर केले असल्याची माहिती मनपा आयुक्त संगीता धायगुडे पत्रकार परिषदेत दिली. राज्यस्तरीय समितीच्या पाहणीनंतर नगरविकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे यांनी शहर हगणदारीमुक्त झाले असल्याचे जाहीर केले आहे.गेल्या दोन महिन्यांपासून शहर हगणदारीमुक्त व्हावे यासाठी मनपा प्रशासनाने कंबर कसली होती. शहरातील ५५ ठिकाणे ब्लॅक स्पॉट म्हणून जाहीर केली होेती, तर ६४ ठिकाणे उघड्यावर शौचास बसले जात होते. मनपाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी कायद्याचा बडगा उगारला होता. उघड्यावर बसणाºया ८१ जणांवर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. शहर हगणदारीमुक्त होण्यासाठी शहरात सहा हजार ९०० वैयक्तिक तर साठ सार्वजनिक शौचालयांची उभारण्यात आली होती. यासाठी १५ कोटी १४ लाख ८६ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले होते. यात वैयक्तिक शौचालयांसाठी १२ कोटी ७९ लाख, तर सार्वजनिक शौचालयांसाठी एक कोटी ४८ लाख ५३ हजार ३२४ रुपयांच्या निधीचा समावेश होता. यंत्रमाग कारखान्यात शौचालय उभारण्यासाठी जनजागृती करण्यात आली. शाळा, व्यापारी संकुले व सार्वजनिक ठिकाणी शौचास बसणाºयांवर आळा घालण्यात आला. गुडमॉर्निंग व गुडनाईट पथके तैनात करण्यात आली होती. हगणदारीमुक्तीसाठी ९८ नुकटा नाटके सादर करण्यात आली होती. यानंतर मनपा प्रशासनाने २१ जुलै रोजी राज्य शासनाला शहर हगणदारीमुक्त झाल्याचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर राज्यस्तरीय समितीने गेले दोन दिवस शहराची पाहणी केली. त्यांच्या पाहणीनंतर मंगळवारी नगरविकास विभागाचे उपसचिव बोबडे यांनी शहर हगणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली आहे. केंद्राची समिती लवकरच शहराची पाहणी करणार असल्याची माहिती मनपा आयुक्त धायगुडे यांनी दिली.
मालेगाव शहर हगणदारीमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 12:58 AM