मालेगाव : पुलवामा येथे केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ व जैशे-ए-मोहमद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करावी या मागणीसाठी सामाजिक संघटनांकडून मालेगाव बंदची हाक देण्यात आली होती. सोमवारी शहरातील व्यावसायिकांनी दिवसभर आस्थापने व दुकाने बंद ठेवली होती. सकाळपासूनच सामाजिक कार्यकर्ते कॅम्प, सटाणानाका, मोसमपूल परिसरात दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करीत होते. त्यामुळे शहरातील सराफ बाजार व गुळ बाजार, एम. जी. मार्केटमधील आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना ठिकठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील नागरिकांत पूलवामा येथे अतिरेक्यांनी केलेल्या दहशतवादी हल्लयात भारतीय जवान ठार झाल्याने तीव्र संताप धुमसत आहे. विविध संघटनांसह सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे कॅण्डल मार्च काढण्यात येत असून मोसमपुलावर शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. आज शहरवाासियांनी पुकारलेल्या उत्स्फूत बंदला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असून सकाळी बाजारपेठा ओस पडल्या होत्या. दुपारनंतर दुकाने सुरू झाली. शहरातील दुकाने बंद असल्यामुळे रस्त्यांवरील वर्दळही कमी झाली होती. सायंकाळपर्यंत दुकाने बंद ठेवण्यात आली होती. शासकीय कार्यालये वगळता शहराच्या पूर्व व पश्चिम भागात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मालेगाव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 4:29 PM