मालेगाव : शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या टीईटी गैरव्यवहाराचे धागेदोरे थेट मालेगावपर्यंत पोहोचले असून, सायबर पोलिसांनी अटक केलेले मुकुंद जगन्नाथ सूर्यवंशी (रा. मालेगाव, जि. नाशिक) व राजेंद्र साळुंखे (बोराळे, ता. नांदगाव) हे दोघेही नांदगाव तालुक्यातील बोराळे येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत सेवेत होते. सूर्यवंशी हा मालेगावी भायगाव शिवारात वास्तव्यास असून, त्याने या घोटाळ्यातून अमाप माया जमविल्याची चर्चा आहे.
सूर्यवंशी याचा मालेगावातील नामपूर मार्गावर पेट्रोलपंप असल्याचीही चर्चा आहे. सूर्यवंशी याने डी.एड.ची पदवी सरदार कॉलेजमधून घेतली असून, २०१०च्या आसपास तो जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झाला होता, तर राजेंद्र साळुंखे हा आमोदा/बोराळे येथील माध्यमिक विद्यालयात कारकून होता. दोघेही घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार तुकाराम सुपे यांच्या संपर्कात २०१२ला आल्याचे सांगितले जाते. नाशिक-मालेगावसह धुळे, जळगाव, नंदुरबार येथपर्यंत यांचे नेटवर्क पसरले असून, या दुष्कर्मात अनेक शिक्षक सामील असल्याचा पोलिसांचा संशय आहे. टीईटी परीक्षा २०१९-२०२० मधील अंतिम निकालात १६ हजार ७०५ परीक्षार्थींना पात्र केले होते. त्यापैकी सात हजार ८०० अपात्र परीक्षार्थींकडून एजंटमार्फत पैसे घेऊन त्यांना पास करण्यात आले आहे. त्यापैकी नाशिक विभागामधील अपात्र परीक्षार्थींना पात्र करणाऱ्यांची संख्या दोन हजार ७७० असून, ती इतर विभागाच्या तुलनेत जास्त असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
इन्फो
सूर्यवंशीची पदस्थापना मालेगावी
अटक करण्यात आलेला शिक्षक मुकुंद सूर्यवंशी यास १८ फेब्रुवारी २०२२ रोजीच निलंबित करण्यात आले आहे. त्याची पदस्थापना मालेगाव तालुक्यात करण्यात आली; परंतु तो अद्याप हजर झाला नसल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. तर राजेंद्र विनायक साळुंके हा बोराळे, ता. नांदगाव येथे क्लर्क म्हणून कार्यरत होता. या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता यात आणखी कुणी सहकारी गुंतले आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत.