आझादनगर : केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यामुळेच मालेगाव शहराचा अमृत शहर प्रकल्प योजनेत समावेश करण्यात आला आहे. शहराच्या भुयारी गटार योजनेस मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून, लवकरच केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात येऊन मंजुरीसाठी प्रयत्न केले जातील. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षभेद विसरून प्रयत्न केले तर सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून स्वप्नातील मालेगाव लवकरच प्रत्यक्षात साकारण्यात येईल, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केले.अमृत शहर प्रकल्प योजनेच्या ई-उद्घाटन कार्यक्रमानंतर मनपा सभागृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी भुसे बोलत होते. यावेळी महापौर हाजी मोहंमद इब्राहीम, उपमहापौर शेख युनुस इसा, आयुक्त रवींद्र जगताप, स्थायी समिती सभापती एजाज बेग, सुनील गायकवाड, कलीम दिलावर आदि उपस्थित होते.भुसे म्हणाले, सदर योजनेद्वारे प्रथम ज्या भागात नागरिकांना पिण्याचे पाणी नाही अशा ठिकाण जलवाहिनीद्वारे पिण्याचे पाणी पोहचविण्याच्या कामास प्राधान्य देण्यात यावे. भविष्यातील २० वर्षाच्या पिण्याचे पाण्याचे नियोजन करीत ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. शहराच्या प्रलंबित भुयारी गटार योजनेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी मान्यता दिलेली आहे. लवकरच केंद्राकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. शहराच्या विकासासाठी १३.५० कोटी रूपयांच्या फाईलवर कालच मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली आहे. यासह नदीसुधार प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत भुसे म्हणाले की, शहरातील घरकुल योजना पुर्णत्वास आली असून त्याच्या उद्घाटनाचे मुख्यमंत्रींना निमंत्रण देण्यात यावे, अशी विनंती महापौरांना केली. मुख्यमंत्री मालेगाव शहरात आले तर शहराच्या पदरात निश्चितच काही पाडून घेण्यात येईल, अशी आशा व्यक्त केली. यावेळी उपमहापौर शेख युनुस इसा म्हणाले की, मुख्यमंत्री मालेगावी आल्यानंतर त्यांना पायउतार व्हावे लागते, अशी भावना झाली आहे. त्यावर सभागृहात एकच हंशा पिकला.यावेळी महापौर हाजी इब्राहीम यांनी शहराच्या दृष्टीने महत्वाची असलेली भुयारी गटार योजनेच्या मंजुरीसाठी भुसे यांना साकडे घातले. विकासासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक आयुक्त रवींद्र जगताप यांनी केले. यावेळी आयुक्त जगताप म्हणाले, एका मनपाच्या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी काम पूर्ण करण्याची विनंती मक्तेदारास करण्यात आली आहे. मनपावर राष्ट्रीय हरित लवादकडे दोन तक्रारी न्यायप्रविष्ठ असून देशात घनदाट लोकसंख्या असलेले मालेगाव शहर प्रथम आहे. यासाठी भुयारी गटारीच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रक्रिया सोडावे लागणार आहे. त्यामुळे शहराचे आमदार, खासदार प्रयत्नशील आहेच. (वार्ताहर)
स्वप्नातील मालेगाव लवकरच प्रत्यक्षात
By admin | Published: October 17, 2016 1:15 AM