अतुल शेवाळेमालेगाव (जि. नाशिक) :- तालुक्यातील गिरणा धरणावर मच्छीमारी करणारे आदिवासी भोई, कोळी, दलित, मुस्लीम मच्छीमार बांधव गेली ५० वर्षे ह्या धरणावर पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. या धरणार कधीही वाद झाले नाही. मात्र, मुंबईच्या एका ठेकेदाराला मासेमारीचा ठेका दिल्यानंतर स्थानिक मच्छीमारांना मच्छीमारी करण्यास मनाई करण्यात येत आहे तसेच विरोध करण्याऱ्या मच्छीमारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचे सांगण्यात येतेय. हा प्रकार रोखावा या मागणीसाठी स्थानिक मच्छीमार बांधवांनी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन केले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी मायावती पाटोळे यांना समस्या व मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
तालुक्यातील मच्छीमारांकडे मच्छीमारिचा पारंपरिक व्यवसाय सोडला तर उत्पन्नाचे दुसरे कुठलेही साधन त्यांच्याकडे नसल्यामुळे उपासमारीची वेळ हजारो कुटुंबांवर ओढवलेली आहे. जर ठेकेदाराकडून मच्छीमारांना मासेमारीसाठी मज्जाव होत असेल तर भविष्यात मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. या प्रकरणावर विशेष लक्ष घालून मत्स्य विभाग महामंडळ तसेच जिल्हाधिकारी यांनी संयुक्तरीत्या चर्चा करून प्रकरणावर तोडगा काढावा तसेच वर्षानुवर्षे मासेमारी करणाऱ्या हजारो कुटुंबांचा देखील विचार व्हावा. शिवाय मासेमारीसाठी होणारा मज्जाव त्वरित मागे घेऊन मासेमारी करू द्यावी, अशी मागणी शेखर ,पगार, निर्मला वाघ, विठाबाई माळी, मनोहर शिवदे, जगलू शिवदे, ललित देसाई, शब्बीर खान, गोपाळ ढाले, अनिल बडदे, राजेंद्र शिंगणे, भीमराव ठाकरे, गोरख बोरसे, शुभम भदाणे, योगेश सोनवणे, दीपक भोई, मंगलदास वाघ, ओंकार सोनवणे, संजय मोरे, दत्तू गायकवाड, तात्या गायकवाड, हरिदास गायकवाड, रतन मोरे, किशोर ठाकरे, केशव सोनवणे आदींनी केली आहे.