मालेगाव : शहरात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढल्याने गेल्यावेळी मुस्लिम बांधवांनी रमजान ईदचे नमाजपठण घरीच केले होते; शनिवारी होणाऱ्या बकरी ईदची नमाजही घरातच अदा करण्याचे आवाहन धर्मगुरूंनी केले आहे. शहरात बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून पोलिसांनी सशस्त्र पथसंचलन केले.राज्य शासनाने केलेल्या आवाहनानुसार महापौर ताहेरा शेख यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते आणि धर्मगुरुंनीही घरातच ईदची नमाज अदा करून शांतता व सलोख्याचे वातावरण टिकवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. ईद म्हटली की, संपूर्ण राज्याचे लक्ष शहराकडे लागून असते. रमजान ईदच्या वेळी पोलीस बंदोबस्तही मोठा मागविण्यात येतो. मात्र शहरवासीयांनी कोरोनाशी लढताना शांतता राखून एकतेचे दर्शन घडविले आहे. शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी इदगाह मैदानावर नमाजपठणाची परवानगी शासनाकडे मागितली; मात्र प्रांताधिकाऱ्यांनी इदगाह मैदानावर न करता घरातच नमाजपठण करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात नागरिकांकडून विशेष काळजी घेतली जात आहे, मात्र काही भागात पुन्हा कोरोना डोके वर काढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.मालेगाव शहरातून शहिदोंकी यादगार, किदवाईरोड, पेरी चौक, मोहंमद अलीरोड, मुशावरत चौक, सुलेमानी चौक, फत्तेह मैदान, नुरानी मशीद, भिक्कू चौक, नेहरू चौकमार्गे मामलेदार गल्ली, चंदनपुरी गेट, मातामठ, शनिमंदिर, रामसेतू, संगमेश्वर, दत्तमंदिर, आंबेडकर पुलावर येऊन नियंत्रण कक्षात पोलीस संचलनाचा समारोप करण्यात आला. २०९ स्थानिक पोलीस यात सहभागी झाले होते.शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १२ कार्यकारी दंडाधिकाºयांची नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी बुधवारी स्वतंत्र आदेश काढून दंडाधिकाºयांची नेमणूक केली. यात नायब तहसीलदार, दंडाधिकारी, उपलेखापाल, पुरवठा अधिकारी यांचा समावेश आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्क चावापर करून, फिजिकल डिस्टन्स ठेवत शांततेत सण साजरा करावा. यंदा शासनातर्फे कत्तलीला बंदी असल्याने महापालिकेतर्फे कत्तलखान्यांची व्यवस्था करण्यात आलेली नाही. शहर कोरोनाशी संघर्ष करीत आहे. मालेगाव कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. महापालिकेतर्फे बकरी ईदची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी कचरा गटारीत टाकू नये, मनपातर्फे औषध फवारणी करून घाणकचरा उचलण्यासाठी ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.- ताहेरा रशीद शेख, महापौर, मालेगाव मनपा