शासकीय विश्रामगृहात सिटी स्कॅन, पॅथॉलॉजी लॅब व रक्तपेढीधारकांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भुसे यांनी सांगितले, सिटी स्कॅन सेंटरवर कोविड व नॉनकोविड रुग्णांच्या चाचण्या करण्यात येतात. अशा वेळी जे रुग्ण कोविड चाचणी (एच.आर.सी.टी.) करतात त्यानंतर संपूर्ण मशीनचे सॅनिटायझेशन करणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित लॅबधारकांनी काळजी घेण्यासोबतच ज्या रुग्णांचा एच.आर.सी.टी. स्कोर हा पाचपेक्षा अधिक असेल अशा रुग्णांची माहिती तत्काळ महानगरपालिकेसह वॉर रुमच्या संकेतस्थळावर अपलोड करावी. लॅबमध्ये रुग्णांची गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धतीचा अवलंब करून चाचणीसाठी लागणार वेळ लक्षात घेऊन त्याआनुषंगाने नियोजन करण्यात यावे. नागरिकांनीदेखील रुग्णासोबत अनावश्यक गर्दी टाळावी. शहरात एकूण नऊ लॅब या मान्यताप्राप्त असून, याव्यतिरिक्त असलेल्या अनधिकृत लॅबवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही भुसे यांनी दिल्या. खाजगी लॅबवर स्वॅब टेस्टिंग करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची माहिती आरोग्य प्रशासनास कळविणे कायद्याने बंधनकारक असून, त्याची अंमलबजावणी आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
इन्फो
आरटीपीसीआर दरातही सवलत
आर.टी.पी.सी.आर.ची लॅबमध्ये होणाऱ्या चाचणीसाठी आकारण्यात येणारा दर एक हजारांवरून ७०० रुपये, तर महानगरपालिका हद्दीतील रुग्णांच्या घरी जाऊन स्वॅब कलेक्शनच्या चाचणीचा दर एक हजार दोनशेवरून आठशे रुपये आकारण्याची विनंती लॅबचालकांनी मान्य केली आहे. त्याचीही अंमलबजावणी शनिवारपासून करण्यात येणार आहे. शहरातील बेकायदेशीर लॅब चाचण्या करण्यासाठी सक्षम असतील व नोंदणी करण्यासाठी इच्छुक असतील त्यांची कायदेशीर नोंदणी प्रक्रिया राबवून त्यांना मान्यताप्राप्त करण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबतही भुसे यांनी सूचित केले.
इन्फो
रक्तदान शिबिरांचे आवाहन
शहरात एकूण तीन रक्तपेढ्या असून, या रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा कमी आहे. यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. प्लाझ्मा संकलनामध्ये करण्यात येणाऱ्या तपासण्या व त्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरामध्ये अजून शक्य तेवढी सवलत देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करत कोरोना महामारीमध्ये आरोग्य सेवा पुरविणाऱ्या सर्व चालक, मालकांनी माणुसकीच्या नात्याने रुग्णांना ‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर शक्य तेवढी मदत करण्याचे आवाहनही भुसे यांनी उपस्थितांना केले.