शहर परिसरात दरवर्षी एप्रिल महिन्यात कडक ऊन पडत असते. यंदा मार्चमध्येच उन्हाचा प्रकाेप वाढला आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला हाेता. परंतु, वातावरण निवळल्याने सूर्य पुन्हा आग ओकू लागला आहे. मागील आठवड्यात शहराचे तपमान ३८ अंशाच्या आसपास हाेते. मंगळवारी पारा ४२ अंशावर पाेहाेचला. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे परिणामी आरोग्य विभागाकडून याेग्य ती काळजी घेतली जात आहे. कडक ऊन, उष्माघातासारख्या प्रकाराला निमंत्रण देणारे ठरते. उष्माघाताचा झटका आल्यास वेळीच उपचार मिळणे आवश्यक आहे. अन्यथा रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने सामान्य रुग्णालयात इमर्जन्सी उपचार कक्ष सुरू करण्यात आला आहे. रुग्णांना बाहेरच्या उष्ण वातावरणाचा त्रास हाेऊ नये म्हणून कुलरसारख्या विशेष उपाययाेजना करण्यात आल्या आहेत.
----------------
भरपूर पाणी प्यावे
नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, सुती व सैल कपडे वापरावे , शरीराचा घाम पुसून काढावा, ताप आल्यास गार पाण्याचे अंग पुसावे, थंड पाणी, शहाळे, फळांचा रस यांचा भरपूर वापर करावा, तहान नसली तरी दर २० मिनिटांनी पाणी प्यावे, चहा-काॅफीसारखे उत्तेजक पेय पिणे टाळावे, नशा आणणारे मादक पेय पिऊ नये, उन्हात जाणे टाळावे, पांढरी टाेपी, उपरणे, गाॅगल्स यांचा वापर करावा, ही काळजी घेतल्यास उष्माघातापासून बचाव करता येईल.
---------------
उष्माघाताची लक्षणे
ताप येणे, थकवा जाणवणे, डाेकेदुखी किंवा चक्कर येणे, हातापायात गाेळे चढणे, जीभ आत ओढली जाणे, त्वचा रुक्ष हाेणे, हृदयाचे ठाेके जलद गतीने पडणे,उलटी हाेणे.
--------------
उन्हामुळे शरीरातील पाणी कमी हाेते. नागरिकांनी क्षारांचा समताेल सांभाळणारी पेये जरूर घ्यावी. सध्या काेराेना संकट असल्याने धाेका वाढला आहे. जनतेने उन्हापासून बचावासाठी काळजी घ्यावी.
- डाॅ. किशाेर डांगे, वैद्यकीय अधीक्षक