नाशिक : मालेगावमधील कोरोना रुग्णसंख्येचा तुलनेत घटलेला आलेखाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान पीठाच्या नेतृत्वात मालेगावकरांच्या प्रतिकारशक्तीचा अभ्यास करण्यासाठी मालेगाव मॅजिक संशोधन प्रकल्प सुरू हे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्यातील नमुने तीन महिन्यांनंतर संकलित करण्यात येणार होते. मात्र या कालावधीत मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना येत असल्याने रमजान ईदनंतर १२ किंवा १३ मेपासून दुसऱ्या टप्प्यातील नमुने संकलित करण्यात येणार असल्याची माहिती निवृत्त लेफ्टनंट जनरल तथा कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी दिली आहे.
मालेगाव मॅजिक संशोधनात जानेवारीमध्ये पहिल्या टप्प्यात सुमारे २७ नमुने संकलित करण्यात आले. यात सहा महाविद्यालयांच्या संयुक्त पथकातील २६९ आरोग्य सेवकांनी महत्त्वाचे योगदान दिल्याचे डॉ. माधुरी कानिटकर यांनी शुक्रवारी (दि.२५) विद्यापीठात पत्रकार परिषदेत सांगितले. नमुने संकलित करताना संगणकीयप्रणालीचा अवलंब करताना या भागातील विविध समाज व समुदायाच्या नागरिकांचा तसेच स्त्री-पुरुषाचे संतुलन अपेक्षेनुसार साधले गेले असून, विद्यापीठ व विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून या नमुन्यांची तपासणी विद्यापीठाशी संलग्न धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक सुविधांची उपलब्धता करून देत करण्यात आल्या. मात्र या प्रक्रियेदरम्यान जवळपास शंभर नमुने युमिलाइज्ड झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
पहिल्या टप्प्यात मालेगावात संकलित करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी जवळपास शंभर नमुने युमिलाइज्ड झाले आहेत. परंतु संशोधनादरम्यान १० टक्के नमुने अशाप्रकारे युमिलाइज्ड होणार हे गृहीत होते. प्रत्यक्षात हे प्रमाण खूपच कमी आहे.
- माधुरी कानिटकर, कुलगुरू
पीएसएल मोबाइलची घेणार मदत
तिसऱ्या टप्प्यात पीएसएल मोबाइलचीही मदत घेतली जाणार आहे. यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यात संकलित नमुन्याच्या चाचण्या अर्धा तासाच्या आत कराव्या लागणार असल्याने धुळे वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक यंत्रणा उभारण्याचे नियोजन विचाराधीन होते. मात्र पीएसएल मोबाइल लॅब उपलब्ध झाल्यास हे संशोधन अधिक सोयीस्कर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाविद्यालयाच्या कामकाजास १५ दिवसांत प्रारंभ
जिल्हा रुग्णालयात सुरू होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक मनुष्यबळ निवडप्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुढील १५ दिवसांत ४० प्राध्यापकांसह सहायक व सहयोगी प्राध्यापकांचे मिळून ८० प्राध्यापक रुजू होणार असून, प्रत्यक्ष शैक्षणिक कामकाजापूर्वी प्रशासकीय कामकाज सुरू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.