----
दुचाकी चोरीचे सत्र सुरू
मालेगाव : शहर परिसरात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज शहरातून दोन ते तीन दुचाकींची चोरी होत आहे. पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. दिवसाढवळ्या महागडी वाहने चोरीला जात आहेत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरटे दुचाकी चोरत आहेत. पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून दुचाकी चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
----
यशवंत आंबेडकर यांना स्मृतिदिनी अभिवादन
मालेगाव : भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा पूर्व व मालेगाव शहर शाखेतर्फे दिवंगत यशवंतराव (भैय्यासाहेब) भीमराव आंबेडकर यांच्या ४४ व्या स्मृतिदिनानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अभिवादन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष गौरव पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास तर मंगेश निकम यांनी भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी वाल्मीक कापडे, जयवंत निकम, रवींद्र निकम, नितीन अहिरे, आनंद मैराळे, नितीन बागुल, दीपक यशोद, नलिनी गायकवाड आदी उपस्थित होते.
----
सर्व्हिस रोडवरील खड्डे बुजविण्याची मागणी
मालेगाव : येथील मनमाड चौफुली परिसरात सर्व्हिस रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. वाहनधारकांना कसरत करीत वाहने हाकावी लागत आहेत. टोल वसूल करणाऱ्या कंपनीने खड्डे दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात घडत असतात. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित टोलवसुली करणाऱ्या कंपनीला खड्डे बुजविण्याची सूचना करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.
----
खासगी वाहनांच्या भाडेदरात वाढ
मालेगाव : इंधनाच्या दराने शंभरी पार केली आहे. परिणामी खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी दरवाढ केली आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. मालेगाव परिसरातून मोठ्या प्रमाणात खासगी प्रवासी वाहतूक केली जाते. ग्रामीण भागात जाणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसत आहे.