मालेगाव : मनपाच्या स्थायी समितीने महासभेला सादर केलेल्या ३९८ कोटी २५ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकावर दीर्घकाळ चर्चा करीत किरकोळ फेरबदलाचे अधिकार महापौरांना देत व नगरसेवक निधीची तरतूद करीत १५ कोटींची वाढ अपेक्षित धरीत सुमारे ४१२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला महासभेने मंजुरी दिली. या अंदाजपत्रकाच्या मंजुरीमुळे शहरातील विकासकामांचा मार्ग मोकळा झाला आहे.महापौर रशीद शेख यांच्या अध्यक्षतेखाली व मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्या उपस्थितीत सोमवारी विशेष अंदाजपत्रकीय सभा बोलविण्यात आली होती. सभेच्या प्रारंभी मुख्य लेखाधिकारी कमरुद्दीन शेख यांनी २०१८-१९च्या अंदाजपत्रकातील महापालिका दर व कर, विशेष अधिनियम वसुली, शिक्षण, भांडवली जमा, सर्वसाधारण कर, शाळा इमारत भाडे, मोबाइल मनोरे, किरकोळ जागा भाडे, व्यापारी संकुलांचे भाडे, खासगी दवाखान्यांची नोंदणी शुल्क आदी लेखाशीर्षकांचे वाचन केले. यावेळी महापालिकेची मालमत्ता करवसुली शंभर टक्के होत नाही यामुळे नगरसेवकांनी कर्मचाऱ्यांच्या बदली करण्याची मागणी केली. यावर मनपा आयुक्त धायगुडे यांनी येत्या एप्रिल महिन्यात कर्मचाºयांच्या बदल्या केल्या जातील, असे सांगितले. रुग्णालय नोंदणी शुल्कवाढीचा विषय चर्चेला आला. शहरात केवळ ८४ रुग्णालयांनी नोंदणी केली असल्याचे डॉ. किशोर डांगे यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक भीमा भडांगे यांनी शहरात दोनशेहून अधिक रुग्णालय सुरू आहेत. त्यांच्याकडूनही नोंदणी शुल्क आकारा असे सांगितले. यावर डॉ. डांगे यांनी संबंधित रुग्णालय संचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे. भाजपाचे नगरसेवक सुनील गायकवाड यांनी शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीचा विस्तार करण्याची मागणी करत या कामासाठी अंदाजपत्रकात विशेष तरतूद करण्याची मागणी केली. यानंतर महापौरांना अंदाजपत्रकात किरकोळ फेरबदलाचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच नगरसेवकांना चार लाख रुपये निधी व विकासकामांसाठी १६ लाख असे २० लाख रुपये निधींची तरतूद केली आहे. तसेच अंदाज-पत्रकात सुमारे १५ कोटी रुपयांची वाढ अपेक्षित धरत ४१२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिली आहे. अंदाजपत्रकाच्या चर्चेत शिवसेनेचे गटनेते नीलेश आहेर, डॉ. खालीद परवेज, अतिक कमाल, बुलंद एकबाल, एजाज बेग, शान-ए-हिंद, अस्लम अन्सारी, ताहेरा शेख आदींनी भाग घेतला.स्थायी समितीने सुचविली करवाढगेल्या ७ मार्च रोजी महापालिका प्रशासनाने ३८२ कोटी ६३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. या अंदाजपत्रकावर १२ मार्च रोजी स्थायी समितीची बैठक झाली. स्थायी समितीने १५ कोटी ६२ लाख ३० हजार रुपयांची वाढ सुचवित ३९८ कोटी २५ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली होती. सोमवारी या अंदाजपत्रकावर महासभेत चर्चा करण्यात येऊन सुमारे ४१२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे.