ठळक मुद्दे दोन वेगवेगळ्या ठिकाणी बेवारस बालिका घारपुरे घाट येथील आधाराश्रमात ठेवलेसंबंधित पालक व नातेवाइकांना आवाहन
नाशिक : मालेगाव परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बेवारस स्थितीत आढळून आलेल्या बालिका महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून नाशिकच्या आधाराश्रमात दाखल करण्यात आल्या आहेत. या मुलींविषयी पालक अथवा नातेवाईक यांनी योग्य पुराव्यासह आधाराश्रमात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण विभागाने केले आहे. मालेगाव-नामपूर रोडलगत असलेल्या कोठरे शिवारात एका नाल्यामध्ये तीन दिवसीय बालिका गेल्या १० आॅक्टोबर रोजी बेवारस स्थितीत आढळून आली. सदर बालिकेस वडनेर-खाकुर्डी पोलीस ठाण्याने बालकल्याण समिती यांच्या आदेशानुसार घारपुरे घाट येथील आधाराश्रमात ठेवले आहे. या बालिकेचे नाव पूर्वा असे ठेवण्यात आले आहे.दुसरी आठ दिवसीय बालिका ही मालेगाव नरडाणे शिवारातील भवानी देवीच्या मंदिर परिसरात बेवारस स्थितीत सापडली. तिचे नाव भगवती असे ठेवण्यात आले असून, सदर बालिकेसदेखील बालकल्याण समितीच्या आदेशानुसार आधाराश्रमात ठेवण्यात आले आहे. या दोन्ही बालिकांविषयी जिल्हा बाल संरक्षण कक्षाने संबंधित पालक व नातेवाइकांना आवाहन केले आहे. ३० दिवसांच्या कालावधीत सदर बालिकांचा ताबा घेण्यास कुणीही न आल्यास त्यांना अनाथ निराधार समजून त्यांचे पुढील पुनर्वसन करण्याचा विचार केला जाईल, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण कक्षाने केले आहे.