मालेगाव : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढविणाऱ्या इच्छुकांपैकी निवडणूक खर्च सादर न केलेल्या सुमारे साडेचारशे जणांना जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी राजकारण बंदी का करण्यात येऊ नये? अशा आशयाच्या नोटिसा काढल्याने खळबळ उडाली आहे. यात १०० ते १५० विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. तालुक्यात झालेल्या १२० ते १२५ गावांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्याच्या सरपंच पदासाठी चार ते पाच टप्प्यात निवडणूक कार्यक्रम राबविण्यात आला होता. या निवडणूक रिंगणात असलेल्या ४८२ जणांनी आपला निवडणूक खर्च सादर केला नाही. त्यामुळे या सर्वांना जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने आपल्याला पाच वर्ष निवडणूक लढविण्याची बंदी का आणू नये? तसेच आपल विद्यमान सदस्यत्व का रद्द करू नये? या आशयाच्या नोटिसा काढल्या असल्याची माहिती तहसील कार्यालयातून मिळाली आहे. या नोटिसा काढलेल्यांच्या यादीत सुमारे १५० विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकारणात मोठी उलथापालथ माजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यात काहींना आसुरी आनंद झाला असून, काहींनी विद्यमानांचे सदस्य रद्द होऊन नवीन निवडणुका होतील या आशेने निवडणुकीसाठी आपल्या बाह्या वाळण्यास सुरुवात केली आहे. या पूर्वीही जिल्हाधिकाऱ्यांनी पहिल्या टप्प्यात काहींना अशा आशयाच्या नोटिसा काढल्या होत्या. (प्रतिनिधी)
४५० जणांना मालेगावी नोटिसा
By admin | Published: February 01, 2016 9:58 PM