मालेगाव : शहरातील खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून अवाजवी भाडे आकारणी करून प्रवाशांची पिळवणूक केली जात असल्याची तक्रार ग्राहक पंचायतीतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील कानाकोपºयातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पुणे, मुंबईसह इतर मोठ्या शहरांत शिक्षण घेत आहेत. सणासुदीच्या किंवा सलग दोन-तीन दिवसांच्या सुट्या मिळाल्या की साहजिक ते घरी येतात. अशावेळी सर्व ट्रॅव्हल्सवाले अडवणूक करून अवास्तव भाडे आकारणी करतात. हे भाडे तीन ते चारपट जास्त असते. लोक मनमानी करून क्षणाक्षणाला भाडे बदलत असतात. जसजशी गाडी भरत जाते तसतसे भाडे जास्त होत जाते. तसेच स्टार्टिंग पॉइंटपासून भाडे आकारणी करतात. शिवजयंतीला मालेगाव ते पुणे एका व्यक्तीचे १२०० रुपये भाडे आकारले. विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. तसेच रस्त्यात काही झाले तर त्याचीही जबाबदारी घेत नाही. रिक्षा, टॅक्सी यांचे भाडे आपल्या-मार्फत ठरवून त्यांच्यावर आपले नियंत्रण असते, मग ट्रॅव्हल्सवाल्यांसाठी हे नियम का नाही? मागणी बघून भाडे बदलले जाते ही अडवणूक असून, परिस्थितीचा गैरफायदा घेऊन अनुचित व्यापार पद्धती नाही का? योग्य तेच भाडे कायमस्वरूपी ठरविण्यात येऊन ग्राहक संरक्षण कायद्याचे पालन करून प्रवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर ग्राहक पंचायतीचे तालुका संघटक अध्यक्ष हरीश मारू, सहसंघटक सोहनलाल जैन, उमेश शहा, कैलास शर्मा, राहुल आघारकर, अशोक बागुल, संजय पांडे आदि पदाधिकाºयांच्या सह्या आहेत.
मालेगाव : जादा भाडे आकारणीमुळे प्रवाशांत संताप ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून मनमानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:59 PM