मालेगावसह परिसरात पुन्हा थंडी
मालेगाव: शहरासह परिसरात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ऊन वाढू लागले हाेते, परिणामी उन्हाचे चटके बसू लागले होते. अचानक थंडी गायब झाल्याने नागरिकांनी थंडीसाठी काढलेले ऊबदार कपडे ठेवून दिले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा थंडी वाढू लागली असून नागरिकांना सर्दीचे विकार जडू लागले आहेत. अचानक आलेल्या थंडीमुळे पिकांवरही विपरित परिणाम जाणवू लागले आहेत. आता रबी पिकांना थंडी पोषक असली तरी काही शेतकऱ्यांची रबी पिके काढणीला आली आहेत.
शाळा सुरू झाल्याने पुन्हा चहलपहल
मालेगाव: पाचवी ते आठवीचे वर्ग गेल्या दहा महिन्यांनतर पुन्हा सुरू झाल्याने शहर व परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची चहलपहल दिसू लागली आहे. मात्र, अद्यापही काही पालकांत काेरोनाची भीती असल्याने ते आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यात धजत नाहीत. शाळा सुरू झाल्याने बाजारपेठांमध्ये शालेय साहित्याच्या खरेदीसाठी पालकांनी गर्दी केली आहे.
मालेगावी जुना आग्रारोडच्या दुरुस्तीची मागणी
मालेगाव : शहरातील दरेगावकडे जाणाऱ्या जुना मुंबई-आग्रा महामार्गाची ठिकठिकाणी दुरवस्था झाली असून संबंधितांनी रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या मार्गावर रस्त्याला ठिकठिकाणी ठिगळ लावण्यात आले असून जाफरनगर भागात एका बाजूकडील रस्ता दुरुस्त करताना दुसऱ्या बाजूकडील नादुरुस्त रस्ता तसाच सोडून देण्यात आला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी सुटते.
मालेगावी ईएसआयसी दवाखान्याची मागणी
मालेगाव: शहरात मोठ्या प्रमाणात यंंत्रमाग कामगारवर्ग असून इतर क्षेत्रांतील कामगारवर्गही मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचा ईएसआयसीचा हप्ता कापला जातो. मात्र शहरात ईएसआयसीच्या कामगारांना आराेग्य सुविधा मिळत नाही. कामगारांना आरोग्य सुविधा देण्याची व्यवस्था करावी. शहरातील सर्वच कामगारांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ईएसआयसीचे कार्यालयदेखील सुरू करावे, अशी शहरातील यंत्रमाग कामगारांची मागणी केली आहे.