अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी मोर्चा उघडूनही त्याचा काहीएक परिणाम गुन्हेगारांवर होत नसून शहरात अवैध शस्रे विक्री सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे. काही तरुण बेकायदा तलवारी घेऊन शहरात दाखल होणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांना मिळाली होती. खांडवी यांनी नव्यानेच स्थापन केलेल्या विशेष पोलीस पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक आर. के. घुगे यांना कारवाईची सूचना केली. घुगे व पोलीस कर्मचारी प्रकाश बनकर, भूषण खैरनार, संदीप राठोड व पंकज भोये यांनी महामार्गावरील हॉटेल मड्डेजवळ सापळा रचून तलवारींची रिक्षा (क्र. एमएच ४१ एटी १०७) सह तीन जणांना ताब्यात घेतले, तर एक जण फरार झाला. अधिक विचारपूस केली असता मुख्य संशयित (फरार) मोहंमद महेमुब, अब्दुल रशीद यास माहिती असल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी संदीप प्रेमसिंग राठोड (३२), विशेष पोलीस पथक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पवारवाडी पोलीस ठाण्यात मोहंमद आसिफ शकील अहमद (२७), इरफान अहमद शकील अहमद (३८, दोन्ही, रा. मर्चंटनगर), अतिक अहमद सलीम अहमद (२८, रा. इस्लामपुरा व मोहंमद महेबूब अब्दुल रशीद, रा. कमालपुरा या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन जणांना अटक करण्यात आली. मुख्य संशयित मोहंमद महेबुब हा फरार असून, पोलीस त्याचा कसोशीने शोध घेत आहे. अधिक तपास पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नाझीम शेख करीत आहेत.
चौकट :
शहरातील गुन्हेगारी व अवैध व्यावसायिकांवर धडक कारवाई करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी दोन दिवसांपूर्वीच विशेष पोलीस पथकाची निर्मिती केली. पथकानेही पहिलीच कारवाई करीत ४० तलवारी जप्त केल्या. जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध शस्र बाळगणाऱ्यांविरोधात मोहीम उघडण्यात येऊन कारवाई केली जात आहे; परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर तलवारी जप्त करण्यात आल्याने गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याची चर्चा होत आहे.