मालेगाव : येेथील पोलीस प्रशासनाने व गोवंश पथकाने बकरी ईद काळात २८४ जनावरांना जीवदान दिले आहे, तर ४०० किलो मांस व तब्बल ५२ कारवाया करून ४५ लाख ४० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यात ६७ जणांवर गोवंश संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बकरी ईदच्या पूर्वी मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या जनावरांची कत्तलीच्या हेतूने वाहतूक होत असते. या प्रकाराची गंभीर दखल घेत अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी गेल्या जून व जुलै महिन्यात विशेष मोहीम राबविली होती. यासाठी विशेष गोवंश पथकांची नियुक्ती केली होती. या पथकाने व अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. शहराच्या प्रवेशद्वारांवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच गुप्त माहिती मिळाल्यानंतर कत्तलीच्या हेतूने बांधून ठेवलेल्या जनावरांची सुटका करण्यात आली. सर्वाधिक कारवाया पवारवाडी व शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तब्बल २८४ जनावरांची कत्तल होण्यापासून वाचले आहेत. पोलिसांनी ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ६७ जणांवर प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईमुळे गोवंश रक्षकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
मालेगाव पोलिसांनी दिले २८४ जनावरांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:10 AM