मालेगाव : शहर व तालुक्यात दमदार पाऊस होऊनही तालुक्यातील सातपैकी चार लघुप्रकल्प कोरडेठाक आहेत. केवळ साकूर, बोरी अंबेदरी लघुप्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून लुल्ले प्रकल्पात ५० टक्के जलसाठा आहे.
मालेगाव तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. येथील वार्षिक पर्जन्यमान ४५७ मि.मी. असून आतापर्यंत ५७० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. सरासरी १२३ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या ३ वर्षांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. यंदाही तालुक्यातील माळमाथा, काटवन भागात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाने सरासरी ओलांडली. तालुक्यातील मालेगाव, दाभाडी, वडनेर, करंजगव्हाण, झोडगे, कळवाडी, सौंदाणे, सायने, निमगाव या मंडळांमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. मात्र, तालुक्यातील साकुरी व बोरी, अंबेदरी या दोनच प्रकल्पांमध्ये जलसाठा झाला आहे. बोरी अंबेदरी धरणावर माळमाथा पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. धरण भरल्यामुळे या भागातील शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. साकूर धरणही ओव्हरफ्लो झाले आहे, तर अजंग धरण कोरडेठाक आहे. झाडी, दहिकुटे, दुंधे धरणातही निरंक जलसाठा आहे. या सातही प्रकल्पांमध्ये जलसाठा झाला, तर तालुक्यातील शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असतो. सध्या शेती शिवारातील विहिरींना पाणी उतरले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिके हमखास येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली असली, तरी चार लघुप्रकल्प परिसर पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
लघुप्रकल्पाचे नाव - जलसाठा (दलघफुमध्ये) - टक्केवारी - क्षमता
बोरी अंबेदरी - ९९.६९ - १०० टक्के - ९९.६९
साकुरी - ५१.९१ - १०० टक्के - ५१.९१
लुल्ले - २०.८४ - ५० टक्के - ४१.३२
अजंग - ० - ० - ४०.९७
झाडी - ० - ० - ३९.९१
दहिकुटे - ० - ० - १०२.४१
दुंधे - ० - ० - ४९.७९