सोयगाव : चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे शहरातील राजमाता जिजाऊ उद्यान जलमय झाले असून उद्यानाला जलतरण तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरवर्षी ही समस्या उद्भवते. उद्यान खोल भागात असल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात येथे साचते. साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास मोठा कालावधी लागत असल्याने या उद्यानाचा शक्यतो डिसेंबर ते जून महिन्यातच नागरिकांना वापर होतो. उद्यानाच्या पूर्व दिशेला तर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्यात शेवाळ वाढण्यास सुरुवात झाली आहे. साचलेल्या पाण्यात डास वाढले असून आजारांना आमंत्रण मिळत आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस भिंती खचलेल्या आहेत. वेळीच दुरुस्ती न झाल्यास त्याला लागून असलेल्या भिंती पडण्याची शक्यता आहे. आजूबाजूच्या परिसरातील व्यापारी संकुलात ही पावसाळ्यात बेसमेंटमध्ये पावसाचे पाणी साचल्याने मोटारीच्या साहाय्याने पाणी काढण्यात येते. महानगरपालिकेने उद्यान उभारताना पाऊस पाणी साचण्याची शक्यतेकडे दुर्लक्ष केल्याची नागरिक तक्रार करत आहेत.
-------------------
रस्ता खड्डेमय
साचलेल्या पाण्यातील वस्तू सडून दुर्गंधी पसरते. परिसरातील नागरिकांना या समस्येला ही तोंड द्यावे लागत आहे. उद्यानासमोरील रस्ता ही खड्डेमय झाला असून दुरुस्तीची नितांत गरज आहे. महानगरपालिकेने या उद्यानाचे काम करताना सर्व शक्यता लक्ष्यात घेऊन जलतरण तलाव करणे अपेक्षित होते, तरी उद्यान करून जनतेचा कररूपी पैसा पूर्णपणे पाण्यात घातल्याचा जनतेतून रोष व्यक्त होत आहे.
-----------------
उपाययोजनेची गरज
शहरातील एकमेव मोठे उद्यान असल्याने शुक्रवारी, शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची समस्या निर्माण होते. तसेच लहान मुलांच्या खेळण्यासाठी अधिक साहित्य, उपकरणे वाढण्याची गरज आहे. महानगरपालिकेने लवकरात लवकर या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
--------------------
खरे म्हणजे येथे जलतरण तलावच व्हायला हवा होता. महानगरपालिकेने सर्वांगीण विचार न करता उद्यान उभारले. आता वर्षातून फक्त सहा महिने वापराचे उद्यान झाले आहे. जनतेचा कररूपी पैसा, करोडो रुपये पाण्यात घालण्याचे काम केले आहे.
-निखिल पवार, सामाजिक कार्यकर्ते, मालेगाव