-------------------
भायगाव शिवारात कोविड सेंटर
ग्रामीण भागातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर भायगाव शिवारातील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाची इमारत अधिग्रहीत करण्यात आली आहे. या ठिकाणी १२० खाटांचे कोविड सेंटर सुरू केले जाणार आहे. तालुक्यात सध्या ३७८ बाधित रुग्णांची संख्या आहे. झोडगे रुग्णालयात डीसीएचसी सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. या ठिकाणी ३० रुग्णांच्या उपचारासाठी सुविधा करण्यात आली आहे. कोविडच्या नियमांचे उल्लंघन रुग्ण संख्या वाढीला कारणीभूत ठरत आहे.
------------------
महापालिकेकडून पथके
लॉकडाऊन टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी मनपा, पोलीस व महसूल विभागाने चार पथके तयार केली आहेत. ही पथके गर्दीवर नियंत्रण ठेवणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील आस्थापनांसमोर गर्दी आढळून आल्यास संबंधित दुकानदारांवर कारवाई केली जाणार आहे. तर येत्या २९ तारखेला साजरा होणाऱ्या शब-ए-बारात सणावर कोरोनाचे सावट दिसून येत आहे. पोलीस नियंत्रण कक्षात कब्रस्तान ट्रस्टींची बैठक झाली. या बैठकीत शासनाने निर्देशित केलेल्या नियमानुसार शब - ए - बारात सण साजरा करावा, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे. मशिदींमध्ये नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कब्रस्तानमध्ये दुवा पठण करण्यासाठी येताना गर्दी करू नये. तोंडाला मास्क वापरावा. कब्रस्तान व मशिदींमध्ये प्रवेश करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, अशा सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.