वातावरणातील बदलाने नागरिक आजारी
मालेगाव: शहर, परिसरात वातावरणातील बदलामुळे वृद्धांसह नागरिक हैराण झाले असून, त्यांना साथीच्या विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. थंडीचा कडाका वाढत असताना, अचानक थंडी कमी होऊन उकाडा जाणवू लागला. दोन दिवस पाऊस पडल्यामुळे नागरिक साथीच्या आजारांना सामोरे जात आहेत. सर्दी, पडसे अशा विकार वाढत असताना कोरोनाची दहशतही कायम आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांची वाढली चुरस
मालेगाव: तालुक्यात ९९पैकी ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ९६ ग्रामपंचायतीत निवडणुकीची चुरस वाढली आहे. काही ग्रामपंचायतीत उमेदवारच मिळाले नसल्याने, काही जणांना मैदानात पॅनलच उतरविता आले नाही, तर काही ठिकाणी पॅनलमधूनच उमेदवार पळून दुसऱ्या पॅनलला जाऊन मिळाल्याने पॅनल प्रमुखांचे हाल झाले. आता येत्या चार दिवसांत साम, दाम, दंड, भेद नीती वापरून कोण विजयी होते, याकडे गामस्थांचे लक्ष लागले आहे.
सर्वपक्षीय नेते आमनेसामने
मालेगाव: तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व असताना, ग्रामपातळीवर मात्र शिवसेनेतील दोन गट एकमेकांसमोर निवडणुकीला उभे ठाकल्याचे दिसून येत आहे. त्यात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने उमेदवारांपुढे पेच निर्माण झाला आहे. परिणामी, ग्रामीण भागात पक्षीय भेद न ठेवता, सर्वच पक्षाचे नेते वेगवेगळ्या पॅनलमध्ये दिसत आहेत. राज्यात एकमेकांसमोर विरोधात लढणारे नेते मात्र, स्थानिक पातळीवर एकमेकांच्या हातात हात घालून निवडणूक लढवित असल्याने ग्रामस्थांची मात्र करमणूक होत आहे.