आझादनगर : राज्य सरकारने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण तातडीने लागू करावे या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ आॅगस्ट रोजी नवीन गिरणा पुल येथे दुपारी दोन वाजता महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुस्लिम रिजर्वेशन फेडरेशनचे अध्यक्ष आमदार आसिफ शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.उर्दू मिडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत आमदार शेख पुढे म्हणाले की, डॉ. मेहमुदुर्ररहमान कमिटीच्या शिफारशीनुसार २०१४ साली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुस्लिम समाजास पाच टक्के आरक्षण दिले होते; मात्र सत्ता परिवर्तन झाले याच दरम्यान काही लोकांनी मुस्लिम आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने मुस्लिम समाजाला शैक्षणिक पाच टक्के आरक्षण कायम ठेवीत उर्वरित सर्वच आरक्षण रद्द केले. त्याची पुर्तता न करता भाजपा शासनाने मुस्लिम आरक्षणाकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष केले आहे. सध्या महाराष्टÑात मराठा समाजास आरक्षण द्यावे. या मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळत असल्याने सरकारने मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देत आहे. यासाठी खास अधिवेशनही बोलावण्याचे मान्य केले आहे; मात्र यास्थितीतही मुस्लिम समाज व धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत एक शब्दही बोलत नाही. यावरुन सरकारची निती स्पष्ट होत आहे. भाजपा सरकारने जनतेचा विश्वास गमावल्याने कुठलाही समाज सरकारवर विश्वास दाखविण्यास तयार नाही. याचा परिणाम म्हणूनच सर्व समाजास आरक्षणासाठी रस्त्यावर यावे लागत आहे. सरकारने विशेष अधिवेशनात मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा समावेश केला नाही तर मुस्लिम रिजर्वेशन फेडरेशनतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा निर्धारही शेख यांनी शेवटी व्यक्त केला. यावेळी हाफीज अनिस अझहर, नगरसेवक असलम अन्सारी, माजी नगरसेवक अॅड. हिदायतउल्लाह, इनामुल रहेमान खान, गुफरान अन्सारी, लतीफ बागवान आदि फेडरेशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
मालेगावी क्रांतीदिनी रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 7:04 PM
आझादनगर : राज्य सरकारने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण तातडीने लागू करावे या मागणीसाठी मुस्लिम समाजाच्या वतीने क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ आॅगस्ट रोजी नवीन गिरणा पुल येथे दुपारी दोन वाजता महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुस्लिम रिजर्वेशन फेडरेशनचे अध्यक्ष आमदार आसिफ शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.उर्दू ...
ठळक मुद्देआसिफ शेख : मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी