सोयगाव : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून, मालेगावी शुक्रवारी झालेल्या दगडफेकीच्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावून लालपरीचे रक्षण केले.शुक्रवारी (दि१२) मालेगाव येथे त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यानुसार मालेगावी सुन्नी जमेतुल उलमा व रजा अकॅडमीसह मुस्लीम संघटनांनी बंद पुकारला होता. दुपारपर्यंत बंद शांततेत पाळला जात असताना सायंकाळी किदवई रोडसह जुना आग्रा रोडवर जमावाने दगडफेक सुरू केल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. जमावाने काही दुकानांच्या काचा फोडतानाच गाड्यांवरही दगडफेक केली. घटनास्थळी तत्काळ अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक लता दोंदे यांनी भेट देऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.मालेगाव बसस्थानक हे शहरात मध्यवर्ती ठिकाणी असून, याच भागात जमाव जमला होता. दगडफेक सुरू होती. बसस्थानकात बाहेरील बाजूने दगडफेक सुरू केली त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे, खिडकीच्या काचा, कंट्रोल रूम, रेस्ट रूमच्या खिडक्या यांचे नुकसान झाले. बसस्थानकात संपाला बसलेले कर्मचारी, काही प्रवासीही होते, तसेच आगारात जागा नसल्याने पाच ते सहा बस या स्थानकात होत्या. संपाला बसलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत प्रवासी सुरक्षित ठिकाणी उभे करीत बाहेर असलेल्या पाच ते सहा बस जिवाची पर्वा न करता डेपोच्या आत नेल्या. शिवाय दोन तीन बस सुरू होत नसल्याने धक्का देत सुरक्षित स्थळी लावत लालपरीचे रक्षण केले.संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी लालपरींचे नुकसान होऊ दिले नाही. मालमत्ता नुकसानीपासून वाचविली म्हणून स्वतः आगारप्रमुखांनी मालेगाव डेपोतील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. याबाबत विचारले असता, कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, ह्यलालपरी आमचे दैवत असून, आमचा परिवार तिच्या जिवावर मोठा आहे. त्यामुळे लालपरीला आम्ही आई मानतो आणि तिचे रक्षण आमची पहिली जबाबदारी व कर्तव्य आहे. आलेले प्रवासीदेखील दैवत असल्याने त्यांनाही सुरक्षित ठिकाणी उभे करीत त्यांना आधार दिला. आम्ही आमचे काम इमानेइतबारे करीत आहोत.ह्ण
मालेगावच्या एसटी कर्मचाऱ्यांनी संपातही केले लालपरीचे रक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 11:38 PM
सोयगाव : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून, मालेगावी शुक्रवारी झालेल्या दगडफेकीच्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावून लालपरीचे रक्षण केले.
ठळक मुद्देसीसीटीव्ही कॅमेरे, खिडकीच्या काचा, कंट्रोल रूम, रेस्ट रूमच्या खिडक्या यांचे नुकसान झाले.