मालेगाव : शहर - तालुक्यात घरोघरी व विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये विघ्नहर्ता सुखकर्ता श्रीगणरायाच्या प्रतिष्ठापनेची जय्यत तयारी पूर्ण झाली असून, भक्तगण श्रीगणेशाच्या आगमनाची आतुरतेने वाट पहात आहेत. दुष्काळी परिस्थितीचे सावट यंदाच्या गणेशोत्सवावरही दिसून येत आहे. तसेच श्रीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरुवारपासून यंदाच्या श्रीगणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. त्यासाठी येथील बाजारपेठ सजली आहे. शहरातील गूळबाजार, संगमेश्वर, मोसमपूल, जुना आग्रा रस्ता, सटाणा नाका, कॅम्प सोमवार बाजार, रावळगाव नाका, मोची कॉर्नर, कॅम्परोड आदि ठिकाणी वैविध्यपूर्ण श्रीगणेशमूर्तींनी दुकाने सजली आहेत. शहर - तालुक्यातील विविध लहान - मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी आधीच आपल्या पसंतीच्या श्रीगणेश मूर्तींची आगावू नोंदणी मूर्तिकाराकडे करून ठेवलेली आहे. सालाबादप्रमाणे काही मंडळांनी नंदुरबार, नाशिक, पेण, धुळे या ठिकाणाहूनदेखील मूर्ती मागविल्या आहेत. विक्रेत्यांकडे काही घरगुती गणेशमूर्तींची देखील नोंदणी झाली आहे. यंदाच्या श्रीगणेशमूर्तींमध्ये जय मल्हारफेम श्री खंडेरायाची मूर्ती नावीण्यपूर्ण आहे. त्याचबरोबर लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, शंकर पार्वतीसोबतचा श्रीगणेश या पारंपरिक मूर्तींना मागणी कायम आहे. मूर्ती साहित्य दरातील वाढीमुळे श्रीगणेशमूर्तींच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झालेली आहे. सजावट व आरास याचेही साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीस आले आहे. त्यात थर्माकोल, प्लास्टिक, चमकी, विविध रोषणाईच्या माळा यांचा समावेश आहे. (वार्ताहर)
मालेगावी कडेकोट पोलीस बंदोबस्त
By admin | Published: September 16, 2015 11:11 PM