मालेगावी लॉकडाऊन विरोधात गेल्या आठवड्यात विविध राजकीय पक्षांनी व व्यापाऱ्यांनी आंदोलने करून विरोध केला होता यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. परिणामी शहरातील पूर्व भागात काही यंत्रमाग कारखाने व दुकाने, आस्थापना अंशत: सुरू होती, तर किदवाईरोडवरील मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद होती. शहरातील गूळ बाजारातील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाला होता. येथील मोसम पूल चौकातील लोढा मार्केट, कॅम्प रोडवरील बाजार पेठ, सोमवार बाजार परिसरात वीकेण्ड लॉकडाऊनमुळे शुकशुकाट जाणवत होता. नागरिकांनीही घराबाहेर पडणे टाळले होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद होते. या बंदसाठी पोलीस, महसूल व महापालिकेच्या यंत्रणेला सारखी धावपळ करावी लागली होती. शहराच्या पूर्व भागात पोलिसांची गस्त पथक माघारी फिरतात व्यवसाय सुरू केले जात होते. शहरातील नवीन व जुने बसस्थानकावरील प्रवासी संख्येतही घट झाली होती. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होती, मात्र खासगी रुग्णालये, विविध लॅबोरेटरीज, वैद्यकीय चाचणी केंद्रांवर रुग्णांनी मालेगावी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले आहे.
मालेगावी वीकेण्ड लॉकडाऊन संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:14 AM