मालेगाव : कर्नाटक राज्यातील हिजाब बंदचे पडसाद शुक्रवारी मालेगावी उमटले. जमियतुल उलमाने हजाबच्या समर्थनार्थ पुकारलेल्या हिजाब दिनाला मालेगावी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहराच्या पूर्व भागात मुस्लीममहिला हिजाब परिधान करूनच बाजारपेठ व इतर ठिकाणी जाण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या.
सध्या राज्यात हिजाब परिधानावरून वादविवाद सुरू आहेत. याचे पडसाद मालेगावीही उमटले. गुरुवारी जमियतुल उलमाने येथील कल्लू स्टेडियमवर महिला मेळावा घेत, जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते, तसेच शुक्रवारी हिजाब दिवस पाळण्याचे आवाहन केले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी मालेगावी आठवडे बाजार भरतो, तसेच मुस्लीम महिला जुम्माचे औचित्य साधत माहेरी जात असतात. जुम्माला विशेष महत्त्व आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात पाहुणे व नातलग एकमेकांकडे जात असतात. शुक्रवारीही मुस्लीम महिला हिजाब परिधान करून घराबाहेर पडल्या होत्या. विशेष म्हणजे बापू गांधी मार्केट, अंजुमन चौक, किदवाई रोड, बुनकर बाजार आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. शालेय विद्यार्थिनींसह लहान-लहान मुलींनीही हिजाब परिधान करून समर्थन केले होते. दिवसभर महिला कामानिमित्त घराबाहेर पडताना हिजाब घालूनच निघत असल्याचे दिसून आले.
दरम्यान, हिजाब दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, पोलीस उपअधीक्षक लता दोंदे यांनी परिस्थितीवर विशेष लक्ष ठेवले होते. ठिकठिकाणी व मुख्य चौकांमध्ये वाढीव बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वरिष्ठ अधिकारी व पाेलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी दिवसभर गस्त घातली होती.
कोट...
जमियतुल उलमाने पुकारलेल्या हिजाब दिनाला मालेगावी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. मुस्लीम महिला घराबाहेर पडताना हिजाब घालून पडत होत्या. विद्यार्थिनींसह छोट्या मुलींनीही हिजाब परिधान केला होता. कर्नाटक शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. आम्ही याचा निषेध करतो. महिलांच्या संरक्षणासाठी हिजाब महत्त्वाचा आहे.
- मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, आमदार तथा अध्यक्ष जमियतुल उलमा, मालेगाव.