मालेगाव : येथील तनवेल अशोक कदम (२०) याचा खंडाळा घाटातील अमृतांजन पुलावरून सेल्फी काढताना तोल जाऊन ५० फूट खोल मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर पडल्याने मृत्यू झाला. तो पुणे येथील सिंहगड कॉलेजमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. आज बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आरबीएच कन्या विद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. अशोक कदम यांचा चिरंजीव होय. त्याच्या निधनाचे वृत्त कळताच परिसरावर शोककळा पसरली.मालेगाव तालुक्यातील वजीरखेडे येथील प्रा. अशोक कदम यांचा तनवेल हा एकुलता एक मुलगा होता. तनवेल हा लहानपणापासून हुशार होता. अकरावी- बारावीला तो पुण्याला होता. वडील अशोक कदम आरबीएच कन्या विद्यालयात शिक्षक होते. मालेगाव कॅम्पातील सुयोग मंगल कार्यालयाजवळ असलेल्या इंद्रप्रस्थ कॉलनीत ते राहतात. तनवेलच्या पश्चात आई, वडील आणि बहिण असा परिवार आहे. सोमवारी रात्री तनवेल आणि त्याचे मित्र आकाश ठाकूर, कौस्तुभ पवार हे पुण्याला गेले होते. त्यानंतर काल रात्री त्याची शेवटची भेट झाल्याचे आकाश ठाकुरने सांगितले.
सेल्फी काढताना मालेगावच्या तरुणाचा पडून मृत्यू
By admin | Published: June 22, 2016 10:18 PM