मालेगाव कॅम्प : शहर परिसरात वसंत ऋतुची चाहूल लागली असून, वाढत्या उन्हामुळे तपमानात वाढ झाली आहे. दिवसभर वाढलेली उष्णता व रात्री काही प्रमाणात थंडीचे वातावरण या बदलत्या वातावरणामुळे नागरिक त्रासले आहेत. बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारीत वाढ होत आहे, तर शहरातील रस्तेही दुपारी ओस पडू लागले आहेत.शहर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांत वातावरणात बदल दिसून आला. ऐन पावसाळ्यात अनेक दिवस पावसाने पाठ दाखविली. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली होती. नंतर पाऊस काही प्रमाणात झाला. नियमित पारंपरिक पिकांची पेरणीही झाली; परंतु पावसाळ्याच्या अखेरीस वातावरणात बदल होऊन बेमोसमी पाऊस व गारपिटीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागला. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सर्वांना थंडीचा सामना करावा लागला होता. कडाक्याच्या थंडीने नागरिक हतबल झाले होते. काही दिवसांपासून परिसरात वातावरणात बदल झाला आहे. दिवसभर उन्हाच्या झळा, तर पहाटेपर्यंत थंडी असे वातावरण तयार झाले आहे. थंडीमुळे दिवसभर बंद असलेले घरातील पंखे व कुलर, वातानुकूलित यंत्रणा पुन्हा दिवसा सुरू झाल्या आहेत. या ऊन व थंडीच्या वातावरणामुळे नागरिक त्रस्त होत आहे. नागरिकांना वाढत्या उष्म्यामुळे शारीरिक व्याधींचा सामना करावा लागत आहे. अनेक रुग्णांना उपचारासाठी दवाखाने गाठावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले असून, आगामी मार्च, एप्रिल व मे ह्या महिन्यांत कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. त्यामुळे आतापासून नागरिकांनी काळजी घेण्याची तयारी दिसून येत आहे. (वार्ताहर)
मालेगावचा पारा चढू लागला
By admin | Published: February 19, 2015 12:01 AM