----
बाजारपेठेत खरेदीसाठी उसळली गर्दी
मालेगाव : वीकेंड लॉकडाऊननंतर व संपूर्णत: लॉकडाऊनच्या भीतीने सोमवारी किराणा मालासह इतर वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी उसळली होती. गेल्या दोन दिवसांपूर्वी सर्व दुकाने बंद होती. सोमवारी सकाळी बाजारपेठेतील दुकाने खुली झाल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील जनतेने किराणा मालासह इतर वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली. लॉकडाऊनच्या भीतीमुळे नागरिक अधिकची खरेदी करताना दिसत होते. परिणामी बाजारपेठेत व रस्त्यांवरची वर्दळ वाढली होती.
----
शेतीकामांना मजुरांची टंचाई
मालेगाव : सध्या कांदा काढणीसह रब्बी हंगामातील पिकांची काढणी व कापणी सुरू झाली आहे; मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व उन्हाच्या प्रकोपामुळे मजुरांनी शेतीकामाकडे पाठ फिरवली आहे. परिणामी ग्रामीण भागात मजुरांची टंचाई जाणवत आहे. शेतीकामांना मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत तर सध्याच्या बदलत्या हवामानाचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे.
----
मालेगावच्या मुक्कामी बसफेऱ्या बंद
मालेगाव : येथील आगाराच्या मुक्कामी बसफेऱ्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्याचा निर्णय आगार प्रशासनाने घेतला आहे. तालुक्यातील गिरणा डॅम, झाडी, साकुरीझाप, देवघट, लुल्ले, गरबड, पोहाणे आदींसह तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील मुक्कामी बस बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी प्रवाशांचे हाल होत आहेत.
----
ग्रामीण भागात पुन्हा पेटू लागल्या चुली
मालेगाव : गॅस सिलिंडरचे भाव वाढल्याने ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. रॉकेल व गॅस उपलब्ध होत नसल्याने महिलांनी आता पुन्हा चूल पेटविली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र सरकारने प्रत्येक कुटुंबाला गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिला; मात्र चढ्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडेनासे झाले आहे.