मालेगाव : शहरात बकरी ईद शांततेत व मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील पोलीस कवायत मैदानावर मुख्य नमाज अदा करण्यात आली. शहरात नऊ ठिकाणी व विविध प्रार्थना स्थळांमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आली. बुधवारी सकाळी पोलीस कवायत मैदानावर मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांनी बयान करताना म्हणाले की, मुस्लिम समाजासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. मात्र केरळ राज्यात आलेल्या पुरामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. सुमारे २५ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. मुस्लिम बांधवांनी सण साजरा करीत असताना केरळमधील पुरग्रस्त व आपत्तीग्रस्तांना मदत करावी असे आवाहन करत पुरग्रस्तांसाठी प्रार्थना करण्यात आली. शहरातील मुख्य ईदगाह मैदानासह नऊ ठिकाणी व प्रार्थना स्थळांमध्ये ईदची नमाज अदा करुन दुवा पठण करण्यात आले. नमाज नंतर शहरातील मुख्य कत्तलखान्यासह मनपाचे उभारलेल्या चौदा तात्पुरत्या कत्तलखान्यात कुर्बानी दिली जात होेती. गोवंश हत्याबंदी कायद्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले होते. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर जनावरांची कुर्बानी दिली जात होती. दरम्यान, बकरी ईदच्या मुख्य नमाजाच्या वेळी मौलानामुफ्ती मो. इस्माईल यांचा जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल प्रांताधिकारी अजय मोरे, मनपा आयुक्त संगिता धायगुडे, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे, रत्नाकर नवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शांतता व एकात्मता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मालेगावी बकरी ईद शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:35 PM