नाशिक : मालेगाव येथील १४ जणांना नव्याने कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्यानंतर यातील २ जणांचा अहवाल येण्यापुर्वीच मृत्यू झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यातील एकाचा १३एप्रिल तर अन्य बाधिताचा शुक्रवार (दि.१७) रोजी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या चार झाली आहे. जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेदिवस वाढतच आहे. शुक्रवारी एकाच दिवसात १४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने प्रशासन हादरले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा मालेगावसह आता सत्तरवर जाऊन पोहोचला आहे. दरम्यान, परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा ठपका ठेऊन अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांची तडकाफडकी बदली करत त्यांच्या जागेवर धनंजय निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आठवडाभरापासून रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने मुंबई, पुण्यापाठोपाठ जिल्ह्यातील मालेगाव कोरोनाच्या बाबतीत ‘हॉटस्पॉट’ ठरू पाहात आहे. जिल्ह्यात गुरूवारी नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटनेस २४ तास उलटत नाही तोच शुक्रवारी (दि.१७) मालेगाव येथीलच आणखी १४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांचा आकडा ७० च्यावर पोहोचल्याचे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मालेगावच्या पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात कुठेही घट येत नसल्याने मालेगावातील लागण कशी रोखावी, हाच प्रशासनापुढे सर्वात मोठा प्रश्न आहे.
मालेगावी एकाच दिवशी १४ कोरोनाबाधित; अहवाल येण्यापुर्वीच दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 10:24 PM