मालेगाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने शहरातील दोन दुचाकीचोरांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत.गुरुवारी (दि.२८) मध्यरात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी मुंबई-आग्रा महामार्गावर गस्त घालीत होते. त्यावेळी परिसरात काही संशयित कमी किमतीत मोटारसायकल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार पथकाने मुंबई- आग्रा महामार्गावर सवंदगाव फाटा परिसरात सापळा रचून संशयित अब्दुल सलीम अब्दुल सलाम (रा. नांदेडी हायस्कूल जवळ) यास ताब्यात घेतले. याच्या ताब्यात असलेल्या हिरो स्प्लेंडर प्लस दुचाकीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी त्यास पोलिसीखाक्या दाखवताच सदरची दुचाकी आंबेडकर पुतळा परिसरातून चोरी केल्याची कबुली त्याने दिली. आरोपी अब्दुल सलीम याच्या ताब्यातून चोरीच्या आणखी दोन दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता साथीदार फरान अंजुम अब्दुल गफ्फार (रा. नवरंग कॉलनी) याच्यासह मालेगाव व येवला शहरातून या दुचाकी चोरीची कबुली दिली.फरान अंजुम यास येथील अल्लमा पूल परिसरातुन ताब्यात घेण्यात आले. दोन्ही संशयितांच्या ताब्यातून चोरीच्या तीन स्पलेंडर प्लस, एक फॅशन प्रो, एक हिरो एचएफ डिलक्स अशा पाच दुचाकी (किंमत १ लाख ३० हजार रुपये) जप्त करण्यात आला आहेत.या चोरीबाबत मालेगाव शहर, किल्ला व येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संजय दुनगहू, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील अहिरे, हवालदार सुहास छत्रे, वसंत महाले, पोलीस नाईक चेतन संवत्सरकर, राकेश उबाळे, देवा गोविंद, पोलीस कर्मचारी फिरोज पठाण, रतिलाल वाघ, दत्ता माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मालेगावी दोन दुचाकीचोरांना शिताफीने अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:01 AM
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने शहरातील दोन दुचाकीचोरांना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत.
ठळक मुद्देपाच दुचाकी जप्त : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली कारवाई