मालेगाव कॅम्प : मालेगाव तालुक्यातील प्रतिजेजुरी समजल्या जाणाºया श्रीक्षेत्र चंदनपुरी येथील खंडोबा मंदिरात शुक्रवारी चंपाषष्ठीनिमित्त यात्रोत्सव साजरा करण्यात आला. हजारो मल्हारभक्तांनी खंडोबारायाचे दर्शन घेतले. मंदिरात पहाटे नामदेव भोगीर, राजेंद्र बेलन, डी. एस. पाटील यांनी पूजा केली. यावेळी पंचक्रोशीतील मल्हारभक्तांनी खंडोबारास वांगेभरीत व भाकरीचा नैवेद्य दाखविला. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. चंपाषष्ठीनिमित्त चंदनपुरीत मालेगाव तालुक्यासह कसमादे, खांदेश, मध्य प्रदेश, गुजरात येथील मल्हारभक्तांची दिवसभर मांदियाळी होती. खोबरे-भंडारची उधळण झाल्यामुळे चंदनपुरीला सोनेरीकिनार प्राप्त झाली होती. चंदनपुरीच्या खंडोबा मंदिरात नित्य पूजनासह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. आज मंदिरात पहाटे ४ वाजेपासून धार्मिक विधी सुरू आहे. गावातूनच प्रभात फेरी, काकडा आरती करण्यात आलीे. जेजुरीनंतर महाराष्टÑात चंदनपुरीचे मोठे धार्मिक महत्व आहे. खंडोबाची दुसरी पत्नी बाणाईचे माहेर चंदनपुरी आहे. त्रेतायुगात मणी व मल्ल या दोन राक्षसांनी भुतलावर अराजकता माजवली होती. त्यामुळे मानव त्रस्त झाले होते. त्यामुळे भगवान शंकराकडे याचना केली. भगवान शंकराने खंडोबारायाचे रुप धारण करुन त्या दोन राक्षसांचा संहार केला तो दिवस म्हणजे चंपाषष्ठी होय. त्यामुळे या दिवसाला फार महत्व आहे. भगवान शंकराकडून आपला वध निश्चित होणार हे राक्षसांना माहित होते त्यांनी देवाला साकडे घातले. वध झाल्यानंतर तुमच्या नावाअगोदर आमचे मार्तंड मल्हार, जय मल्हार असे नाव भक्तांनी घ्यावे. तसेच तुम्हास पशुवध करुन नैवेद्य दाखवावा परंतु नैवेद्य देवाने नाकारला व भक्तांनी मला वांगेभरीत, भाकर, मेथीची भाजीचा नैवेद्य दाखवला तरी मी भक्तांना प्रसन्न होईल असे सांगितले. तेव्हा पासून हा नैवेद्य दावण्याची परंपरा सुरू आहे. चंदनपुरीत चंपाषष्ठी निमित्त मंदिरावर रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भक्तांसाठी इतर सर्व सुविधा जय मल्हार ट्रस्टतर्फे पुरवण्यात आल्या. दर्शनासाठी गर्दी होणार असल्याने पोलीसांनी बंदोबस्त ठेवला होता. मंदिरात सरपंच योगिता अहिरे, उपसरपंच रोशना सोनवणे, राजेंद्र पाटील, सूर्यकांत पाटील, हरिलाल शेलार, पुजारी रामकृष्ण सूर्यवंशीसह इतर सदस्यांसह सप्ताहाचे आयोजक नामदेव सोनवणे, निंबा शेलार, नंदलाल पाटील, राजेंद्र दुधे, हभप माणिक महाराज अहिरे व मल्हार भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंदनपुरी येथील खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त मल्हारभक्तांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:45 PM