नाशिक : जिल्ह्यात केारोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यातच नजीकच्या जळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लसचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे निर्बंध पुन्हा कडक होऊ लागले असून आठ दिवसांपूर्वीच सुरू झालेले मॉल्स पुन्हा सोमवारपासून (दि.२८) बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. याशिवाय शनिवार आणि रविवारी (वीकेंड) विवाह सोहळ्यांना दिलेली परवानगीदेखील रद्द करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल झाले असले तरी नाशिक तिसऱ्या टप्प्यात असताना अनेक प्रकारचे निर्बंध कायम होते. गेल्या साेमवारपासून (दि.२१) पन्नास टक्के क्षमतेने मॉल्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. गेल्या शनिवारी (दि.१९) हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर काही सोमवारी सगळेच मॉल्स सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे मॉल्स सुरू होऊन आठवडाही झाला नाही तोच आता सोमवारपासून मॉल्स बंद करण्यात आले आहेत.
याशिवाय जून आणि काही प्रमाणात जुलैपर्यंत लग्न सोहळेपर्यंत होणार असताना चार मुहूर्त शनिवार- रविवारी येत असल्याने या दिवशी विवाह सोहळ्यांना परवानगी मिळावी, अशी मागणी मॉल्स आणि लॉन्स चालकांनी केली होती. ती मान्य करण्यात आली होती. मात्र, आता बाधितांची संख्या वाढू लागल्याने विवाह सोहळ्यातून आणखी प्रसार होऊ नये यासाठी शनिवार- रविवार म्हणजे वीकेंडच्या दिवशी होणारे लग्न सोहळेदेखील बंद करण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
इन्फो...
३ आणि ४ जुलैस विवाह करण्यास परवानगी
कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेऊन शनिवार- रविवारच्या दिवशी विवाह सोहोळ्यांना परवानगी देण्यात आली असली तरी ३ आणि ४ जुलैला मात्र विवाह सोहळे होणार आहेत. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यासंदर्भात स्पष्टीकर दिले आहे. दरम्यान, एकीकडे सोमवार ते शुक्रवार असो की शनिवार- रविवार लग्न सोहळ्यासाठी केवळ पन्नास व्यक्तींचा परवानगी आहे. त्यामुळे शनिवार- रविवार परवानगी रद्द करून काय होणार, असा प्रश्न मंगल कार्यालय चालकांनी केला आहे.