नाशिक : महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयटीआय सुरू करण्याचा ठराव सोमवारी (दि. २७) महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे महिला उद्योजक आणि बचतगटांच्या उत्पादनांसाठी मॉल उभारणी करण्याचा निर्णयही समितीने घेतला आहे. अध्यक्षस्थानी समितीच्या सभापती सरोज अहिरे होत्या. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे आवश्यक असून, त्यासाठीच ब्यूटिपार्लर, शिवणकाम तसेच अन्य प्रशिक्षण देण्याची गरज समितीने व्यक्त केली. त्याअंतर्गतच ठाणे महापालिकेच्या धर्तीवर नाशकातही खास महिलांसाठी आयटीआय सुरू करण्याचा ठराव करण्यात आला. यावेळी ठाण्यातील आयटीआय आणि महिलांसाठी राबविलेल्या अन्य विकासकामांची पाहणी करण्यासाठी ठाणे दौरा करण्याचा मानसही सभापती अहिरे यांनी व्यक्त केला. महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याची गरज असून, त्यासाठीच समितीच्या माध्यमातून परिचारिका प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सहाही विभागांत महिलांसाठी वसतिगृह सुरू करण्याचेदेखील ठरविण्यात आले. त्यासाठी तातडीने जागा शोधण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. महिला उद्योजकांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मॉल बांधण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. महापालिकांच्या प्रसूतिगृहांची सुधारणा करून गरजेनुसार प्रसूतिगृहे वाढविण्याचादेखील निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीस अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपआयुक्त रोहिदास दोरकूळकर, समिती सदस्य शीतल माळोदे, प्रियांका घाटे, कावेरी घुगे, भाग्यश्री ढोमसे, पूनम मोगरे, नयना गांगुर्डे आदी उपस्थित होते.
बचतगटांच्या उत्पादनासाठी मनपा बांधणार मॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 1:39 AM