----
मंगल कार्यालयातील गजबज झाली कमी
मालेगाव : कोरोनामुळे विवाह सोहळ्यांवर अटी व शर्ती लादल्या जात आहेत. अवघ्या ५० जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळे करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. याचा फटका मंगल कार्यालय चालकांना बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून धुमधडाक्यात होणारी लग्न आता साधेपणाने करावी लागत आहेत. कोरोनामुळे उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा आली आहे.
----
मालेगावी दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ
मालेगाव : शहर परिसरात दररोज दोन ते तीन दुचाकी चोरीला जात आहेत. शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल होत आहेत. गेल्या महिनाभरापासून दुचाकी चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सर्वाधिक दुचाकी चोरीचे प्रकार छावणी व कॅम्पच्या हद्दीत होत आहेत. पोलिसांपुढे दुचाकी चोरटे शोधण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेवर व स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.
-----
रसवंती, शीतपेयांची दुकाने थाटली
मालेगाव : शहर परिसरात उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाली आहे. परिणामी ठिकठिकाणी रसवंती व शीतपेयांची दुकाने थाटली आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक उपरणे, गॉगल, चष्मा, टोपीबरोबरच शीतपेयाचा आधार घेत आहेत. टेहरेफाटा, मोसमपूल, रामसेतू, कॅम्परोडवर रसवंती गृहे सुरू झाली आहेत.
-----
गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा
मालेगाव : शहरालगतच्या गिरणा नदीपात्रातून सर्रासपणे अवैध वाळू उपसा केला जात आहे. टेहरे फाट्याजवळील गिरणा पुलाजवळ बैलगाडींद्वारे वाळूची चोरी होत आहे. पुलाजवळ मोठमाेठे खड्डे पडले आहेत. महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून वाळूमाफियांकडून दिवसाढवळ्या वाळू उपसा केला जात आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
----
वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
मालेगाव : तालुक्यात वीज गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. रब्बी पीक हाता - तोंडाशी आले असताना महावितरण कंपनीकडून भारनियमन केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. महावितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली जात आहे.
-----
पंचायत समितीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार
मालेगाव : मालेगाव पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागात तसेच इवद विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष देवराज गरूड यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रकरणी संबंधित ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक व उपअभियंत्यांची चौकशी करुन त्यांना निलंबित करावे, अशी मागणी गरूड यांनी केली आहे.
-----
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी चौघांना अटक
मालेगाव : जाफरनगर भागातील रूबिना अली या महिलेच्या आत्महत्येप्रकरणी पती साेहराब मोहंमद शरीफ, अहमद सोहराब अली, सिराजअली, सोहेलअली या चौघांना आयेशानगर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मोहंमद युसूफ मोहंमद हारूण यांनी फिर्याद दिली होती. रूबिनाच्या नावावर असलेला प्लॉट तिचा सावत्र मुलगा अहमद याच्या नावावर करून देण्यासाठी छळ केला जात होता. या त्रासाला कंटाळून तिने ॲसिड पिवून आत्महत्या केली होती.