नांदूरवैद्य: कुपोषण समस्येवर मात करण्यासाठी शासनाने गेल्या काही वर्षात विविध उपाययोजना केल्या आहेत. कुपोषणावर मात करण्यासाठी पूरक पोषण आहार देणे आणि वेळीच आवश्यक आरोग्य सेवा पुरविणे या दोन्ही महत्वाच्या बाबी आहेत. याच पाश्वर्भूमीवर नाशिक तालुक्यातील वंजारवाडी येथे कुपोषण मुक्तीसाठी ' एक मूठ पोषण ' अभियानाअंतर्गत अंगणवाडी सेविका कल्पना शिंदे व नंदा मुसळे यांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी योगेश पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.मुले हे राष्ट्राचे भवितव्य असते. मुलांचे आरोग्य, पोषण, आणि वाढ आरोग्यासाठी महत्वाची आहे. यामुळे कुपोषणावर प्रतिबंध करणे गरजेचे आहे. मुख्य कायर्कारी अधिकारी लिना बनसोड, गटविकास अधिकारी श्रीमती बारी, यांच्या कुपोषणमुक्ती चळवळीला वंजारवाडी येथे सुरूवात करण्यात आली. नाशिक तालुका पंचायत समितीचे सदस्य मंगेश सोनवणे व पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष शिंदे यांचे या उपक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले आहे. वंजारवाडी येथे कुपोषण मुक्तीसाठी अंगवाडीमार्फत लाभार्थ्यांना ७०० ग्रॅम हिरवे मूंग, ७५० ग्रॅम शेंगदाणे, अर्धा किलो गूळ, १२५ मिली खोबरेल तेल, दोन किलो बटाटे व ७०० ग्रॅम फुटाणे, असा आहार प्रत्येक लाभार्थ्यांना वाटप करण्यात येतो. यामध्ये ग्रामपंचायतीचा दहा टक्के निधी खर्च करण्यात येत असल्याचे ग्रामविकास अधिकारी योगेश पगार यांनी सांगितले. कुपोषण मुक्तीसाठी आशासेविका देखील मोलाची भूमिका बजावत आहेत.याप्रसंगी शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख देविदास शिंदे, ग्रामविकास अधिकारी योगेश पगार, कल्पना शिंदे, नंदा मुसळे, आशासेविका सुरेखा रायकर, सुनिता गरुड, मदतनीस मनीषा शिंदे, मिराबाई शिंदे, अंगणवाडी मदतनीस आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.