मालेगाव : मालेगाव मर्चण्ट को-आॅपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलला १३ जागांवर समाधान मानावे लागल्याने आगामी काळ खडतर असल्याचे सूतोवाच केले आहे. या निकालामुळे भोसले-अस्मर यांच्यावर सभासदांनी विश्वास दाखविला आहे. शहराची नाळ असलेल्या मामको बँकेची पंचवार्षिक निवडणूक झाली. आगामी काही दिवसांत सत्ताधारी पक्ष आपले अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडून कामकाजाला सुरुवात करतील. या निवडणुकीत विरोधी पॅनलला सहा जागा मिळाल्या आहेत. यामुळे सत्ताधारी पक्षात आनंदाचे वातावरण असले, तरी मागील निवडणूक निकाल पाहता बँकेत विरोधाचे वारे वाहू लागले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. गेली निवडणूक एकतर्फी जिंकणाऱ्या पॅनलप्रमुखांना यावेळी सहा जागांना मुकावे लागले आहे, यावरून शंका घेण्यास वाव आहे.जेथे एकही जागा गमावणार नसल्याचे सांगितले जात होते तेथे सहा जागांवरील उमेदवारांना पराभव पत्करावा लागला आहे. यात नवख्या उमेदवारांचा समावेश अधिक आहे. यामुळे आगामी निवडणुकीत उमेदवारी देताना विचारपूर्वक निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे बोलले जाते.या निवडणुकीत काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळाल्याने अनेक निवडणुकांपासून परंपरागत संचालक ्असलेल्यांना धोक्याची पूर्वसूचना मानली जात आहे. या निवडणुकीत सत्ता राखण्यात यशस्वी झालेल्या पॅनलप्रमुखांना विचार करायला लावण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.शहराच्या अर्थकारणाची नाळ असलेल्या या निवडणुकीत यंदा इच्छुकांनी भरलेल्या अर्जांची संख्या पाहता या निवडणूक लढविण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. या निवडणुकीत सुमारे ७० ते ८० इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यापैकी ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पॅनलमध्ये स्थान न मिळाल्याने काहींनी माघार घेतली होती. यामुळे बँकेत नेमके कशाचे राजकारण केले जाते, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. (प्रतिनिधी)
मामको बॅँकेत विरोधाचे वारे
By admin | Published: November 03, 2015 9:38 PM