नाशिक : वडाळागावातील महेबूबनगर परिसरातील एका नवविवाहितेचा सौदा तिच्या मामीने एका महिलेसोबत केला, मात्र हा प्रकार जेव्हा मामाच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी भाचीला संकटातून वाचविण्यासाठी थेट पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे धाव घेत गा-हाणे मांडले. त्यानंतर नवविवाहित युवतीचे अपहरण करून परराज्यात विक्री केल्याचे बिंग फुटले.महेबूबनगर परिसरात राहणारी संशयित परवीन ऊर्फ राणी ही महिला अंमली पदार्थ विक्रीचा अवैध धंदा करते. या महिलेसोबत पीडित युवतीच्या मामीची ओळख असल्याने तिने तिच्याशी संगनमत करून फेब्रुवारी महिन्यात विवाह झालेल्या भाचीला विक्री करण्याचा डाव आखला. पीडित युवतीचे राजस्थानच्या मुलासोबत लग्न झाले असल्याने मामीने त्याचा फायदा घेत अजमेरला दर्ग्यावर दर्शनासाठी जाण्याचा खोटा बहाणा केला आणि नवविवाहिता भाचीला मध्य प्रदेशमध्ये विक्रीसाठी संशयित राणी व शाहरूख ऊर्फ चेत्याच्या हवाली केले. या दोघांनी पीडितेला अजमेरला नेण्याऐवजी थेट मध्य प्रदेशच्या जावरा तालुक्यात नेले. तेथे विक्री करण्याच्या उद्देशाने तिला आठ ते दहा लोकांना दाखविले. नवविवाहितेला संशयित हेमंत धाकडे नावाच्या व्यक्तीने दीड लाख रुपयांमध्ये खरेदी केले. त्यानंतर राणी व चेत्याने नवविवाहितेला त्याच्या हवाली केले. त्याने सदर पीडितेला घेऊन मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यातील दलौदा-बडवन गावी नेले. तेथे आठवडाभर या नराधमाने युवतीवर अत्याचार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. नांगरे-पाटील यांनी तत्काळ याप्रकरणी तपास करण्याचे आदेश महिला सुरक्षा विभाग व गुन्हे शाखेच्या उपआयुक्त चौगुले यांना दिले. त्यांनी विशेष पथक मध्य प्रदेश येथे रवाना केले. पथकाने मध्य प्रदेशमधील मंदसौर जिल्ह्यातील दलोदा, बडवन ही दोन्ही गावे पिंजून काढत डांबून ठेवलेल्या नवविवाहितेची सुटका केली.मानवी तस्करी रोखण्यासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक कार्यान्वित असून, या पथकाद्वारे या गुन्ह्याची चौकशी केली जाणार आहे. यामागे मानवी तस्करीसारखे रॅकेट आहे की काय? याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गुन्ह्यातील चौघा संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, महिलेला अटक करण्यात आली आहे.
मामीने केला सौदा अन् मामाने फोडले बिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:02 AM