लोकमत न्यूज नेटवर्कममदापूर : येथील राखीव क्षेत्रात वनविभागातर्फे राबविण्यात आलेल्या वन्यप्राणी गणना मोहिमेप्रसंगी प्रगणकांना अवैध हातभट्टीने दारू बनवित असल्याचे लक्षात आले. या गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर नुकतेच काळवीट, हरीण, लांडगे यांची प्रगणना वनविभाग व वन्यजीव संरक्षक समितीच्या वतीने करण्यात आली. संपूर्ण जंगलात ममदापूर, खंरवडी, देवदरी, वायबोथी, राजापूर येथील वन्यजीव संरक्षक समितीचे तीस ते बत्तीस तरुणांच्या साह्याने गणना करत असताना गणेश गायकवाड यांच्या टीमला फॉरेस्ट कम्परमेन्ट नंबर ५३१ मधील आडनदीच्या काठावर गावठी दारूसाठी लागणारे साहित्य झाडांच्या गर्दीत आढळून आले. ममदापूर येथे सात ते आठ ठिकाणी गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरू असल्याचेही निदर्शनास आले. हातभट्टीवर दारू पाडताना काही व्यक्ती दिसल्या असता काही व्यक्तींनी लगेच वनविभागाच्या अधिकारी यांना दूरध्वनीद्वारे सदर माहिती कळविली. अवैध दारूभट्टयांबाबत माहिती कळताच वनरक्षक जे. के. शिरसाठ, एस. आर. सोनवणे तसेच वन्यजीव रक्षक बापू वाघ, काळू सोनवणे, गोरख वैद्य, विशाल पवार यांनी लगेच दाखल होत आडनदीच्या कडेला असलेल्या सर्व सात ते आठ दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. साधारण ३५ लिटर, ५० लिटर, ड्रम व टाक्यांमध्ये सडलेला गूळ, नवसागर इत्यादी रसायन असलेल्या टाक्या आढळून आल्या. तसेच या ठिकाणी सकाळी ९ वाजता तयार करण्यात आलेली पाच लिटर दारूसह ३० ते ३२ ड्रम, टाक्यादेखील जप्त करण्यात आल्या आहेत. चार हजार हेक्टर क्षेत्रात आणखी किती दारूभट्ट्या असतील याचा शोध वनविभागाचे अधिकारी व पोलीस घेतील काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
ममदापूरला हातभट्ट्या उद्ध्वस्त
By admin | Published: May 13, 2017 12:14 AM