-------------------------------------------
औरंगपूरचे शेतकरी कुटुंब उपेक्षित
बाजीराव कमानकर, सायखेडा : औरंगपूर येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी भाऊसाहेब खालकर यांनी शेतात दोन एकर द्राक्ष बाग लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले तर काही सावकारी कर्ज उचलले. सलग तीन वर्षे बाग कधी बेमोसमी पाऊस तर कधी पडलेले बाजार भाव यामुळे एक रुपया शिल्लक राहिला नाही. औषध दुकानदार यांचे कर्ज वाढले, बँकेत कर्ज भरता येईना, मुले लग्नाला आली अशा परिस्थितीत मानसिक अवस्था बिघडली आणि त्यांनी आत्महत्या केली. आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार सोडून त्यांनी आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले. त्यांच्यावर तेव्हा जवळपास नऊ लाख रुपये कर्ज होते. कुटुंबातील माणूस गेला; पण आज हे कुटुंब रस्त्यावर आले आहे. अवघे एक लाख रुपये शासकीय मदत मिळाली. मात्र, इतर कोणतीही मदत मिळाली नसल्याने अजूनही हे कुटुंब उपेक्षित आहे. बँक कर्जमाफी करायला तयार नाही. शिकण्याच्या वयात मुलाला पेट्रोल पंपावर कामाला जावे लागत आहे. पत्नी दररोज दुसऱ्याच्या बांधावर मजुरी करायला जाते. वृद्ध आई-वडील आहेत. लहान वयात प्रवीणला शाळा शिकण्याची इच्छा बाजूला ठेवावी लागली. आज सगळ्या कुटुंबातील व्यक्तींची जबाबदारी घेऊन तो परिस्थितीशी दोन हात करून संघर्षमय जीवन जगत आहे.
कोट....
कर्जबाजारीपणाला कंटाळून वडिलांनी आत्महत्या केली. आज तीन वर्षे होऊन गेले, तरी शासकीय मदत मिळत नाही. ज्या बँकचे कर्ज होते ते माफ करत नाहीत. कोणतीही सवलत दिली जात नाही. आज मी पेट्रोल पंपावर काम करतो, तर आई दररोज दुसऱ्यांच्या बांधावर मजुरी करायला जाते. कुटुंब चालवण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
- प्रवीण खालकर, औरंगपूर
फोटो - ०९ प्रवीण खालकर
-------------------------------
शिरसाणेच्या कुटुंबीयांची अवहेलना
महेश गुजराथी, चांदवड : चांदवड तालुक्यातील शिरसाणे येथील ३५ वर्षीय शेतकऱ्याने १८ ऑक्टोबर २०१९ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्याकडे सोसायटीचे १ लाख ६५ हजार रुपये कर्ज होते.
सूर्यभान मांदळे यांच्या निधनाच्या वेळी असलेले कर्ज १ लाख ६५ हजारांचे व्याजासह २ लाख ४५ हजार रुपये झाले, त्यातील काही रक्कम सोसायटीमध्ये जाऊन भरली. मात्र, गेल्या वर्षी दहा बिगे शेतीत पाहिजे तेवढे उत्पन्न मिळाले नाही तर गेल्या वर्षी कांद्याला भाव नव्हता. त्यामुळे हे उर्वरित कर्ज शासनाने सूट दिली नसताना कसे बसे करून पूर्ण भरले. आत्महत्याग्रस्त शेतकरी म्हणून शासनाने फक्त एक लाखाची मदत दिली. मात्र, कर्जात किंवा व्याजात सवलत दिली नाही. सध्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, अशी व्यथा मांदळे यांच्या पत्नी शैला मांदळे यांनी मांडली आहे. शासनाने आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सर्व कर्ज माफ करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चांदवड तालुक्यात आजपावेतो १५ शेतकऱ्यांनी कर्जाच्या कारणावरून आत्महत्या केल्या आहेत. मात्र, त्यातील फक्त सातच आत्महत्या तपासाअंती कर्जासाठी आत्महत्या असल्याचे सिद्ध झाल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.
कोट....
घरात वृद्ध सासू चंद्रभागाबाई आहेत. मोठा मुलगा संकेत सध्या सातवीत शिकत आहे, तर दुसरा मुलगा करण हा पाचवीत शिकत आहे. सर्व कुटुंबाचे पालन पोषण करता करता आजच्या महागाईत जीव मेटाकुटीस आला आहे. सरकारकडून केवळ एक लाखाची मदत मिळाली; परंतु कुटुंबाचा गाडा कसा हाकावा, ही चिंता सतावत असते.
- श्रीमती शैला मांदळे, शिरसाणे, ता. चांदवड
फोटो- ०९ मांदळे चांदवड
090921\09nsk_19_09092021_13.jpg~090921\09nsk_20_09092021_13.jpg~090921\09nsk_21_09092021_13.jpg
फोटो - ०९ प्रवीण खालकर ~- श्रीमती शैला मांदळे, शिरसाणे, ता. चांदवड~फोटो- ०९ दीपक पवार